ई-मानस : सोमवार, १ ऑक्टोबर २०१२ Print

सोमवार, १ ऑक्टोबर  २०१२
झाला, तो सार्वजनिक समाजसेवकोत्सव?
समाजाचे ‘वैचारिक अभिसरण’ या मूळ उद्देशाला हरताळ फासत बहुतेक सर्वच उत्सवाचे होणारे ‘आíथक अभिसरण’ काही प्रश्न निर्माण करतात. आज साजरे होणारे उत्सव खऱ्या अर्थाने सार्वजनिक राहिले आहेत का? सामान्य जनतेचा प्रत्यक्ष सहभाग कितीसा असतो?  अमुकअमुक गुंडाचा गणपती ते या पक्षाचा / नेत्याचा गणपती असे होणारे नामकरण उत्सवाची दिशा व दशा स्पष्ट करतात.
गणपती उत्सवाच्या दहा दिवसांचा लेखाजोखा पाहता हा उत्सव ‘धार्मिक’ या सदरात मोडू शकतो का? वाजवली जाणारी गाणी, डान्स, गणपतीच्या पाठीला पाठ देत अहोरात्र रंगणारे जुगार, खंडणीप्रमाणेच गोळा केली जाणारी वर्गणी, रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासठी होणारी भक्तांची (?) गर्दी व त्यातून होणारा प्रसादाचा लाभ, अनधिकृत वीजजोडणी वा तत्सम गोष्टी कोणत्या धर्माच्या परिभाषेत मोडतात? गणपतीची मूर्ती वगळता कुठला धार्मिक माहोल असतो?
‘लालबागच्या राजा’वर वृतवाहिन्यांचा बहिष्कार व रोडावणारी गर्दी व त्याचा आजूबाजूच्या मंडळाच्या गर्दीवर होणारा परिणाम हे सर्व समीकरण कशाचे द्योतक आहे. एकीकडे देव सर्वव्यापी आहे असे म्हणायचे, तर दुसरीकडे विशिष्ट मूर्तीच्या दर्शनासाठी २४ ते २६ तास तिष्ठत राहावयाचे (वशिला असेल तर देवही लवकर भेटतो!) हा निव्वळ दांभिकपणा नव्हे काय?  विशिष्ट मूर्तीच नवसाला पावते असा प्रसार अन्य ठिकाणच्या मूर्तीच्या ‘देवत्वावर’ प्रश्नचिन्ह निर्माण करते, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. प्रसारमाध्यमांचा विशिष्ट गणपतीला ‘प्रोजेक्ट’ करण्याचा फंडा बाप्पांच्या सत्तेच्या केन्द्रीकरणाची जनभावना बळावण्यास कारणीभूत ठरते. वर्षांनुवष्रे ‘लाइव्ह’ प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांचे थेट बहिष्कार टाकण्यापर्यंत ‘मतपरिवर्तन’ का झाले, याचाही खुलासा उद्बोधक ठरेल.
दुसरा प्रश्न हा आहे की, वाढती भक्तांची संख्या लक्षात घेता हा ‘कृपा प्रसादाचा’ लाभ १० दिवसच का? जर प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रातील ज्या ज्या गणरायाजवळ आहे त्याचा लाभ ३६५ x २४ x ७ का मिळू नये? सर्वच समाज आनंदी, सुखी होईल. त्यातून मंदीच्या विळख्यात अडकलेल्या अर्थकरणालाही गती मिळेल.
कुठलाही उत्सव असला की ‘सर्व भक्तांचे हार्दकि स्वागत’ असे लागणारे फलक (यापैकी ९० टक्के अनधिकृत) राज्यात समाजसेवकांचा किती सुकाळ आहे याची प्रचीती देतात. पिण्याचे पाणी, बसण्यास जागा, विसर्जनापूर्वी आरती करण्यासाठी सुविधा या सारख्या मूलभूत सुविधाही ज्यांच्या गावी नसतात ते समाजसेवक सालाबादप्रमाणे प्रत्येक उत्सवात ‘कोरडे स्वागत’ करण्यात धन्यता मानण्यात मश्गूल असतात. उत्सव गणपतीचा, पण एखादा दुसरा अपवाद वगळता गणपतीचा फोटो किती फ्लेक्सवर असतो हे डोळसपणे पाहिल्यावर हा ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ की ‘सार्वजनिक समाजसेवकोत्सव’ असा प्रश्न यंदाही पडला.
- सुधीर लक्ष्मीकांत दाणी, बेलापूर, नवी मुंबई