कविता बालभारतीच्या पुस्तकातल्या Print

alt

शेखर जोशी,  १ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील कविता आपण अभ्यासाकरिता पाठ करत असतो. शाळा आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कधी तरी आपल्याला शाळेच्या दिवसांतील एखादी कविता किंवा त्यातील ओळ आठवते आणि आपण स्मरणरंजनात जातो. कधीकधी असं वाटतं की या सर्व कविता आपल्याला पुन्हा वाचायला मिळाल्या तर किती मजा येईल.  तर ‘बालभारती’मधील स्मरणरंजनात घेऊन जाणाऱ्या आठवणींच्या कवितांचा हा खजिना आता ई-पुस्तक स्वरूपात रसिकांसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच एका ब्लॉगच्या माध्यमातूनही या सर्व कवितांचे एकत्रित संकलन उपलब्ध झाले आहे.
ई-साहित्य प्रतिष्ठानने या कवितांचे ई-पुस्तक प्रकाशित केले असून त्याची संकल्पना आणि संकलन सुरेश शिरोडकर यांचे आहे. स्मरणरंजनाचा आनंद देणाऱ्या या कविता ‘बालभारती- आठवणीतल्या कविता’ या ई-पुस्तकात एकत्र करण्यात आल्या आहेत. ग. ह. पाटील यांच्या ‘छान किती दिसते फुलपाखरू’ या कवितेने आपण कवितांच्या खजिन्यात पाऊल टाकतो आणि पुढची प्रत्येक कविता वाचायची आपल्याला ओढ लागते.
इंदिरा संत यांची ‘गवतफुला’, ग. ह. पाटील यांचीच ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’, कुसुमाग्रज यांची ‘उठा उठा चिऊताई’, मंगेश पाडगावकर यांची ‘टप टप पडती अंगावरती’, नारायण गोविंद शुक्ल यांची ‘लाल टांगा घेऊनी आला लाल टांगेवाला’, वा. भा. पाठक यांची ‘खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे’, केशवकुमार यांची ‘आजीचे घडय़ाळ’ यासह इतर अनेक कविता येथे आहेत.alt
या कवींबरोबरच ना. धों. महानोर, वसंत बापट, प्रा. शंकर वैद्य, बा. भ. बोरकर, पद्मा गोळे, बालकवी, कवी ग्रेस, वामन पंडित, यशवंत, ना. घ. देशपांडे, ना. वा. टिळक, माधव ज्युलियन, केशवसुत, मोरोपंत, साने गुरुजी, भा. रा. तांबे आदींच्याही कविता या पुस्तकात असून कोणतीही कविता उघडून वाचायला सुरुवात केल्यानंतर प्रत्येकजण  नक्कीच शाळेच्या आठवणीत पोहोचेल.
बालभारतीमधील आठवणीतल्या कविताविषयक सुरेश शिरोडकर यांचा http://sureshshirodkar.blogspot.in असा
ब्लॉग असून त्यावर या कविता संकलित केल्या आहेत.
या सर्व कविता ई-साहित्य प्रतिष्ठानने पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. पहिल्या भागात १५० कवितांचा समावेश करण्यात आला आहे. अन्य कविता पुढील भागात देण्यात येणार आहेत . तसेच पहिला भाग वाचून रसिक वाचकांनी ज्या सूचना केल्या आहेत त्याची दखल घेऊन या सर्व कविता सुधारित स्वरूपात देण्याचा  प्रयत्न केला जाणार आहे.   ई-साहित्य प्रतिष्ठानने  आजवर १६० ई-पुस्तके प्रकाशित केली आहेत. ‘बालभारती- आठवणीतल्या कविता’ या उपक्रमात रसिक वाचकांनाही सहभागी होता येईल. उपक्रमास मदत करणाऱ्या वाचकाला ई-साहित्य प्रतिष्ठानच्या १५० ई-पुस्तकांचा समावेश असलेली सीडी भेट म्हणून देण्यात येणार आहे.  
लहानपणी शाळेत असताना शिकलेल्या या सर्व कविता एकत्रित स्वरुपात पुन्हा वाचण्याचा,  मनात गुणगुणण्याचा  किंवा मोठ्याने म्हणण्याचा आनंद प्रत्येकाला घेता येणार आहे. या कविता वाचून आपण सर्व नक्कीच पुन्हा शाळेच्या जुन्या आठवणीत आणि स्मरणरंजनात जाऊ हे अगदी नक्की
ई-साहित्य प्रतिष्ठान  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सुरेश शिरोडकर        This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it