संतसाहित्यातील सुभाषिते Print

altशेखर जोशी, सोमवार , ४ जून २०१२
सुभाषित हा प्रकार आपल्यापैकी बहुतेकजणांनी शाळेत असताना अभ्यासला असेल.  ज्यांनी शंभर गुणांचे  संस्कृत घेतले असेल त्यांना तर ही सुभाषिते अभ्यासासाठी पाठ करावी लागली असतील. आठवी ते दहावीचा अभ्यास करताना ज्यांनी संस्कृत विषय घेतला होता, त्यापैकी अनेकांना आपम त्याकाळी संस्कृत सुभाषितांची केलेली घोकंपट्टी आठवत असेल.  शाळा संपली आणि संस्कृत सुभाषितांचा अभ्यासही मागे पडला असेल. मराठी भाषेचे विद्यार्थी, अभ्यासक, प्राध्यापक,  शिक्षक आणि संस्कृतप्रेमी यांच्यापर्यंतच सुभाषिते हा विषय जणूकाही मर्यादित राहिलेला आहे.  कदाचित संस्कृत भाषेतील या सुभाषितांचा अर्थ पटकन कळत नसल्याने त्याकडे थोडे दुर्लक्ष होत असेलही.    
पण बघा ना, सुभाषिते हा विषय निघाला की सुभाषिते ही संस्कृत भाषेतीलच असतात, असे आपल्याला वाटते ना.  
सुभाषिते ही संस्कृत भाषेतीलच  भाषेतीलच   असतात, हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न  अठय़ाहत्तर वर्षांच्या रामभाऊ नगरकर यांनी केला आहे. अथक परिश्रम आणि अभ्यासातून नगरकर यांनी ‘संत सुभाषित कोश’तयार केला आहे. या कोशात संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास स्वामी आणि तुकाराम या पाच संतांच्या साहित्यातील ५ हजार १४७ सुभाषिते एकत्रित देण्यात आली आहेत.
हा कोश पाचशे पानांचा असून तो मासिकाच्या आकारात आहे.
गेली वीस वर्षे नगरकर या कोशावर काम करत होते. या पाच संतांचे सर्व साहित्य वाचून, त्यावर अभ्यास करून सुभाषिताचे निकष ज्याला चपखल बसतील, अशा ओळी त्यांनी अक्षरश: वेचून काढल्या आहेत. हा कोश पुण्याच्या डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे.
कोशात सुभाषित म्हणजे काय, ते ठरविण्याचे निकष कोणते, सुभाषिते मराठीत असू शकतात का, म्हणी आणि सुभाषिते यातील फरक, संस्कृत सुभाषिते असलेले विविध ग्रंथ, त्यांचा धावता आढावा घेण्यात आला आहे. सुभाषिते ही फक्त संस्कृत भाषेतच असतात, हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न नगरकर यांनी  केला आहे.
सुभाषितांची निवड करताना या कोशात त्याचे विषयवार वर्गीकरण करण्यात आले असून ११५ विषय घेण्यात आले आहेत. अतिथी, अभ्यास, आकाश, आरोग्य, आरसा, गंध, गुरू, ग्रंथ, भक्ती, भीती, मद्य, मासा, मुक्ती, मोक्ष आणि अनेक विषयांवरील मराठी सुभाषिते या कोशात आहेत.  कोशात परिशिष्ट देण्यात आले असून या प्रत्येक संतांचे सुभाषित कोठून घेतले त्याचा मूळ संदर्भ देण्यात आला आहे.  
‘अतिथी’ या विषयावर संत ज्ञानेश्वर यांचे
‘जैसा अपमानिता अतिथी ने सुकृतीची संपत्ती’ हे
तर संत एकनाथ यांचे ‘अतिथी जाता परान्मुख त्या सवे जाय पुण्य निक्षेप’ अशी सुभाषिते आहेत.
‘आरोग्य’ या विषयावर संत ज्ञानेश्वरांची ३७ सुभाषिते तर  नामदेव यांची  ४, संत  एकनाथ यांची ८,  रामदास स्वामी यांचे एक  आणि तुकाराम यांची ११ सुभाषिते आहेत. या कोशाचे कोणतेही पान उघडून वाचायला सुरुवात केली तरी संत साहित्यातील वेचक शब्दांचे आणि मोजक्हेया शब्दांत खूप मोठा अर्थ सांगणारे  प्रचंड ज्ञानभांडार आपल्यासमोर शब्दश  उलगडत जाते.  
रामभाऊ नगरकर यांचा संपर्क  दूरध्वनी ०२०-२४४९००७७