वासाचा पयला पाऊस आयला Print

alt

शेखर जोशी, बुधवार , ६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मान्सून केरळमध्ये पोहोचल्याच्या बातमीमुळे आपण सर्वानीच हुश्श केलं असेल. त्याचा पुढील प्रवास जर सुरळीत झाला तर आठ ते दहा दिवसात तो मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल. पुणे, सातारा, सांगली आदी भागात मान्सूनपूर्व सरी या आधी पडून गेल्या. तिथे गारांही पडतात. मुंबई आणि परिसरातील नागरिकांना वळवाच्या किंवा गारांच्या पावसाचा अनुभव नसला तरी पहिला पावसाचा अनुभव आहे. अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्यानंतर जेव्हा पावसाची पहिली सर कोसळते किंवा पावसाचे काही थेंब तापलेल्या जमिनीवर पडले की मन धुंद होऊन जाते. मनात काहीतरी वेगळीच हुरहुर निर्माण होते आणि मनात पहिल्या पावसाच्या आठवणी पिंगा घालायला लागतात. खरंच पहिला पाऊस असाच मन मोहून टाकणारा, धुंद करणारा असतो.
पावसाला एकदा का सुरुवात झाली की इंदिरा संत यांनी म्हटल्याप्रमाणे नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, असे जरी वाटत असले तरी आपण सर्वजण कधी एकदा पाऊस सुरू होतोय, त्याची चातकासारखी वाट पाहात असतो. पहिला पाऊस हा आपल्याप्रमाणेच सर्वाना हवाहवासा वाटत असतो. भारतासारख्या कृषीप्रधान देशात समस्त शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेले असतात. वेळेवर पाऊस सुरू झाला नाही तर शेतकऱयांच्या डोळ्यात पाणी येतं. कधी एकदाचा पाऊस सुरू होतोय, अशी हुहहुर लावणार आणि पावसाला आमंत्रण देणारं एक गाणं आपण वर्षानुवर्षे म्हणत आहोत. या गाण्यान पावसाची आळवणीही करत आहोत. आठवलं.
ये रे पावसा तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
हे गाणं आपण प्रत्येकांन आपल्या लहानपणी एकदा तरी नक्कीच म्हटलेलं असेल. दिवंगत ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनीही
येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैशाचा घे खाऊ
दूर नको जाऊ

अशा शब्दांत पावसाला आवाहन केलं आहे.
तर
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक, कवी आणि नाटककार वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनीही ‘मेघास’ या आपल्या कवितेत,
थांब थांब परतु नको रे घना कृपाळा
अजुनी जाळतोच जगा तीव्र उन्हाळा
अजुनी पायी भासतात पसरलेले निखारे
उसळतात अजुनी गगनी पेटलेले वारे
मरूनी पडतात तरूवरूनी पाखरे
असं म्हटले आहे.
या कवितेच्या शेवटी पावसाला आवाहन करताना ते म्हणतात,
गर्जत ये, ओढित ये, आसूड तडीतेचा
गवरेन्मत्त माथा तो नमव भास्कराचा
लोकाग्रणी नमवी जरा मातल्या नृपाळा
आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो त्या ‘गदिमा’ यांनी ‘आज कुणीतरी यावे’ या गीतात प्रेयसी प्रियकराची कशी आतुरतेने वाट पाहत आहे, त्याचे वर्णन केले आहे. त्या गाण्यातील एका कडव्यात
जशी अचानक या धरणीवर
गर्जत यावी वळवाची सर
तसे तयाने यावे
आज कुणीतरी यावे
असं म्हटलं आहे.
गदिमांनीच लिहिलेल्या एका धनगरी गीतात त्यांनी पाऊस येऊ दे अशी विनवणी केली आहे. ते म्हणतात,
आसुसली माती
पिकवाया मोती
आभाळाच्या हत्ती
आता पाऊस पाड गा
पाऊस पाड..
तर कवी राम मोरे यांनी
पवन अती दाहक हा
छळी मजला तूच पाहा
रात रात लोचनात नीज येईना
बरस रे घना, बरस रे घना
अशी आर्त हाक पावसाला घातली आहे.
कवी वसंत सावंत यांनी
असा मत्त पाऊस यावा मृगाचा
उरींचे उन्हाळेच जावे लया
अशी वीज झाडातूनी कोसळावी
झळातून जन्मास यावे पुन्हा
असे वर्णन केले आहे.
मराठवाडय़ातील प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांनीही आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या आणि पावसाची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्याचे मनोगत
भरू दे यंदा मृगाचं आभाळ
नावाचा तुझ्या यळकोट करीन
पीकू दे यंदा धनधान्याची रास
नावाचा तुझ्या येळकोट करीन
अंगावर चढू दे मुठभर मास
नावाचा तुझ्या येळकोट करेन
अशा शब्दांत व्यक्त केले आहे.
शांताबाई शेळके पावसाला ये अशी प्रेमान विनंती करताना म्हणतात,
ये रे ये रे पावसा
नको दूर राहू
कवळाया तुला
पसरले बाहू
कधीची उभी मी
पदर कसून
नको रे लाडक्या
जाऊ तू रूसून..
सर्वसामान्यांप्रमाणेच शेतकरीवर्गही पावसाकड डोळं लावून बसलेला असतो. आपल्याकडे असा एक समज आहे की, ‘पावशा’ पक्षी दिसला की पाऊस येतो. जणू काही या पक्षाला पावसाची चाहूल लागलेली असते. हा पक्षी ओरडायला लागला की, शेतकरी शेतीची अवजारे काढून पेरणीसाठी सज्ज होतो. बहिणाबाई चौधरी यांनीही ‘पेरनी’ या कवितेत शेतकऱ्यांच्या भावना समर्पक शब्दांत व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात,
पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला पोपया
पेरते व्हा रे
पेरते व्हा रे
पेरनी पेरनी
आले आभाळात ढग
ढगात वाकडी
ईज करे झगमगाट
पहिल्या पावसाची आठवण करून देणारं
वासाचा पयला पाऊस आयला
नभाच?? धुम्मड मातीये भाळीला
हे आणखी एक लोकप्रिय असलेलं गाणं. प्रा. अशोक बागवे यांचे हे गीत उमेश उमप यांनी गायले असून संगीत कौशल इनामदार यांचे आहे. हेच गाणे संगीतकार मिलिंद जोशी व मनीषा जोशी यांनीही गायलं आहे. गाणं एकच असलं तरी दोन्ही गाण्यांची चाल मात्र वेगवेगळी आहे.
तर आपला पाऊस केरळमध्ये दाखल झाला असून काही दिवसात तो मुंबई व महाराष्ट्रात दाखल होणार आहे. तेव्हा त्याचं स्वागत करू या...