शब्दावाचून कळले सारे... Print

alt

शेखर जोशी, सोमवार , ११ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रेल्वेने नियिमत प्रवास करणारे प्रवासी रेल्वे स्थानकातील फलाटांवर एक विशिष्ट प्रकारचा आवाज दररोज नक्की ऐकत असतील. कदाचित काही जणांना तो आवाज कर्णकर्कश्श वाटत असेल तर फलटावरील गर्दीच्या कोलाहालात अनेकांना तो ऐकूही येत नसेल. पण जरा नीट लक्ष दिले तर रेल्वेच्या फलाटांवर हा आवाज सतत ऐकू येत असतो, हे लक्षात येईल. हा आवाज कसला, कशासाठी आणि कोणासाठी येत असतो, याचे उत्तर मला नुकतेच एका प्रसंगातून मिळाले.     
मुंबईत मध्य, पश्चिम किंवा हार्बर रेल्वेच्या उपनगरी लोकलमधून प्रवास करणे म्हणजे एक दिव्य असते. उनगरी लोकल गाडीतील गर्दी आणि या गर्दीतून प्रवास करणे हे धडधाकट प्रवाशांसाठीही एक धाडस असते. धडधाकट माणसांची ही अवस्था तर अपंग, अंध किंवा अन्य व्यंग असलेल्या माणसांचे काय होत असेल त्याची कल्पनाही करवत नाही. रेल्वेच्या उपनगरी लोकलमध्ये अपंगांसाठी स्वतंत्र डबा असतो. मात्र अनेक वेळा अपंगांसाठीच्या असलेल्या या हक्काच्या डब्यात धडधाकट माणसे शिरून अपंगांवर अन्याय करतात.
रेल्वे स्थानकांवर हा अपंगांचा डबा कुठे येतो, त्याची पाटी लावण्यात आलेली असल्याने डोळस अपंगाना हा डबा कुठे ते माहिती असते. मात्र ज्यांना दृष्टी नाही अशा अंध माणसांना नेमका हा डबा कुठे येतो हे कसे काय कळते, बारा किंवा नऊ डब्याची लोकल असेल तर केवळ अंदाजाने ते आपल्या डब्यापाशी येतात का, की पावले मोजून ते बरोबर अपंगाच्या डब्यापाशी येतात. कारण दिसत नसताना केवळ अंदाज घेऊन रेल्वेस्थानकातील गर्दीतून वाट काढत आपल्या डब्यापाशी जाणे त्यांना कसे काय जमते, याचे उत्तर मला अगदी सहज त्या दिवशी मिळाले.
दुपारी कार्यालयात येण्यासाठी मी डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वर उभा होतो. तेवढ्यात एक अंध बाई मला फलाटावर दिसल्या. अपंगांच्या डब्यापर्यंत जाण्यासाठी त्यांना मदत हवी होती. कोणी मला आमच्या डब्यापर्यंत सोडायला मदत कराल का, असे विचारत त्या फलाटावरून हळूहळू चालत होत्या. मी त्यांना तुमच्या डब्यापर्यंत घेऊन जातो, असे सांगून मदतीसाठी त्यांना हात दिला.
अपंगांचा डबा नेमका कुठे येतो, ते फलाटावर लावण्यात आलेल्या पाटीवरून डोळस व्यक्तींना सहज कळते. नऊ आणि बारा डब्यांची गाडीनुसार या डब्याचे स्थान बदलते. त्यामुळे गाडी येईपर्यंत आम्ही अपंगांच्या डब्यापर्यंत पोहोचू की नाही, नाही पोहोचलो तर काय, असे प्रश्न माझ्या मनात आले आणि  तुमचा डबा नेमका कुठे येतो, हे तुम्हाला कसे कळते, असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर त्या अंध बाई म्हणाल्या रेल्वेने आम्हा अंधांसाठी आमचा डबा रेल्वेस्थानकात नेमका कुठे येतो, हे कळण्याची खूप चांगली सोय केली आहे.
तुम्ही मला घेऊन चला, पाच क्रमांकाच्या फलाटावर जेथे कॅन्टीन येते, तेथे आमचा डबा येतो. आता हे नेमके त्यांना कसे माहिती, असा विचार माझ्या मनात आला. त्यावर त्या बाईनी मला सांगितले की, आपण जसजसे आमच्या डब्याच्या जवळ जायला लागू तसा तुम्हाला कू, कू, कू असा मोठा आवाज येईल त्या ठिकाणी मला नेऊन सोडा. रेल्वेने ही आमच्यासारख्या अंधांसाठी ही खास सोय केली आहे.
 मी त्या बाईना हळूहळू पुढे घेऊन गेलो आणि त्यांनी सांगितल्यानुसार कॅन्टीनच्या जवळ तो आवाज मोठ्याने ऐकू येत होता. तो आवाज ऐकल्यानंत आम्ही तेथे थांबलो. त्या बाई मला म्हणाल्या, की आता तुम्ही गेलात तरी चालेल. त्या प्रसंगानंतर रेल्वे फलाटांवर जोरजोरात ऐकू येणाऱया प्रसंगी कर्णकर्कश्श वाटणाऱया या आवाजाचे कोडे उलगडले आणि रेल्वे फलाटावर अंध व्यक्ती कोणाच्याही मदतीशिवाय नेमक्या त्यांच्या डब्यापर्यंत नेहमी कशा पोहचतात, ते कळले. मी त्या बाईंना तुम्ही तुमच्या डब्यापर्यंत कशा जाता, हे शब्दांत विचारले असले तरी रेल्वेने केलेल्या त्या आवाजाच्या सोयीमुळे अंध व्यक्तींसाठी ते शब्दावाचून कळले सारे... कसे असते, त्याचा प्रत्यय आला.