बालमजुरी रोखण्यासाठी जबाबदार तरूण हेच खरं आशास्थान
|
|
युनिसेफ प्रतिनिधी, १३ जून २०१२ मराठवाड्यातलं एक रखरखीत गाव – चांदई - एक्को! जालना जिल्ह्यातलं एक छोटंसं खेडं. जेमतेम हजार उंबरा लोकवस्ती. भोकरधन तालुक्यापासून एक-दीड तास खडबडीत रस्त्याचा प्रवास करून मे महिन्यातल्या रणरणत्या उन्हात आम्ही चांदई ला पोहोचलो! रस्त्यात वाळलेल्या झाडांचीच तेवढी सोबत होती. कापसाच्या शेतामधला सगळा कापूस काढून झाल्याने शेतं रिकामी झाली होती. बांधाबांधावर उरलेल्या काटक्यांच्या मोळ्या रचून ठेवलेल्या दिसत होत्या. घरांच्या अंगणात बाया वाळवणाची कामं करीत बसलेल्या होत्या.
पापड, सांडगे, शेवया करायची कामं हसतखेळत चाललेली होती. माझ्यासोबत गावात काम करणारे काही कार्यकर्ते होते. आम्हाला पाहून काहीजणी चौकशी करीत होत्या; काय भाऊ, आज कसला सर्वे आहे काय? त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत, आम्ही सुनिताच्या घरापर्यंत आलो. सुनिता शिंदे इथली प्रेरिका आहे. युनिसेफच्या सहकार्याने चालवल्या जाणा-या अनेक कार्यक्रमांमध्ये सुनिताचा सहभाग असतो. आज सुनिताने आम्हाला बालमजुरी सोडून पुन्हा शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांना भेटण्यासाठी बोलावलं होतं. गणेश, शीतल, सूरज, दीपक, संतोष अशी कितीतरी छोटी मित्रमंडळी त्यादिवशी सुनिताकडे आली होती. एका लहानशा गावात इतकी मुलं बालमजुरी करीत होती, हे पाहून मन उद्विग्न झालं. मुळात या मुलांवर इतक्या लहान वयात मजुरी करायची वेळ तरी का यावी? उत्तम म्हणाला, माझे आईवडील उसतोडणी करायला जातात; आम्ही मुलं त्यांच्या संगती जात होतो. उत्तमच्या ताईचं लग्न झाल्यानंतर मुलांकडे पहायला घरात मोठं कुणीच नसल्यामुळे उत्तम आणि त्याचा भाऊ आईवडिलांसोबतच जायला लागले. तेवढाच त्यांना हातभार! पण आता त्याच्या आईवडिलांची वणवण थांबली आहे.. ते गावातच रहायला आले आहेत; त्यांनी घर बांधलंय आणि मुलांना पुन्हा गावातल्या शाळेत घातलंय! आजही सुटीच्या दिवसात उत्तम गॅरेजमध्ये काम करतो किंवा कधीकधी सोयाबीनच्या शेतावरही जातो. पण त्याला शाळा खूपच आवडते – खासकरून बिजगणित त्याचा आवडिचा विषय आहे. त्यामुळे तो कधी शाळा मात्र बुडवत नाही. रोज व्यायाम करायला पण तो विसरत नाही – कारण त्याला मिलिट्रित जायचंय!
उत्तम सारखाच सूरज देखिल त्याच्या आईबाबांसोबत उसतोडीला जात असे. पण आता ते गावातच राहून गायचारा काढायला लागले आहेत. लहानपणापासून शाळेत जायची संधीच न मिळाल्यामुळे सूरजला शाळा फारशी आवडायची नाही! त्याला ढोरामागे जायलाच गंमत वाटायची, पण गावातल्या प्रेरक मुलांनी त्याच्या वडिलांना आणि आईला शाळेचे महत्त्व समजावले; त्यानंतर काही दिवस त्याला रोज शाळेत नेऊन सोडायची जबाबदारीही त्यांनी घेतली. रोज शाळेत जायला लागल्यावर हळूहळू सूरजला शाळेची गोडी लागते आहे. त्याची ताईदेखिल आवडीने शाळेत जाते. तिच्यासोबतीने सूरज आणि धाकटी शीतल आता शाळेत जातात. या सगळ्या मुलांशी गप्पा मारताना एक गोष्ट लक्षात आली की या दुष्काळी गावात ; कामाच्या पाठीमागे भटकणारे आईवडिल मुलांच्या शिक्षणाला महत्त्व देऊ शकत नव्हते...जी कुटुंब भटकंती सोडून गावात येऊन राहायला लागली त्यांच्या मुलांना प्रयत्न पूर्वक शाळेत घालणं काही कार्यकर्त्यांना शक्य झालं आहे – पण पुन्हा काही कारणाने आईवडिलांना कामासाठी गाव सोडावं लागलं तर या मुलांचं काय होणार? गावात आजही असे अनेक पालक आहेत जे गावात स्थायिक होऊ शकलेलेच नाहीत. त्यांच्या मुलांच्या शिक्शणाच्या हक्काचं काय होणार? कार्यकर्त्यांकडे यावरदेखिल उपाय आहे – सरकारने चालवलेल्या निवासी शाळांमध्ये मुलांची सोय करता येऊ शकते. पण अनेक पालकांना हा पर्याय आवडत नाही... एकप्रकारे त्यांची भूमिकाही बरोबर असेल! स्वत:च्या जीवाच्या तुकड्याला असं दूर कुठेतरी पाठवणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण आश्चर्य म्हणजे शाळेची आवड लागलेली ही मुलं मात्र आनंदाने हॉस्टेलवर जायला तयार आहेत. कदाचित सुनितासारखे संवेदनशील प्रेरक आणि ही मुले मिळूनच त्यांच्या पालकांना समजावून सांगू शकतील! गावागावातले हे जबाबदार तरूण हेच आता खरं आशास्थान आहेत. |