“मला शिकू द्या” Print

alt

युनिसेफ प्रतिनिधी , गुरूवार , १४ जून २०१२
नुकतेच दहावी –बारावीचे निकाल जाहीर झालेत. मार्क,टक्केवारी,प्रवेशपरिक्षा यांच्या चर्चा सुरु आहेत! भरपूर टक्केवारी मिळवलेल्या मुलांचे कौतुक होत आहे, त्यांच्या मुलाखती छापून येत आहेत – क्वचित कधीतरी अतिशय खडतर परिस्थितीतून मेहनत करून भरपूर गुण मिळवलेल्या कष्टाळू मुलांच्या मुलाखतीदेखिल वाचायला मिळतात. . . .शहरांतल्या वस्त्यांमध्ये रहाणारी ही मुलं बहुतेकवेळा काही ना काही काम करून घराला हातभार लावत असतात. . . पण त्यांच्या या यशोगाथांच्या मागे अनेक न सांगितलेल्या लढायांच्या कहाण्या असतात. अतोनात कष्ट केल्यामुळे ज्यांना अभ्यासाला वेळच मिळू शकत नाही अशा असंख्य मुलांच्या करूण कहाण्या कधी आपल्या कानी पडतही नाहीत. त्यांच्या जगण्याच्या लढाईची कधीच कुठे नोंद घेतली जात नाही! अशा काम करून शिकणाऱ्या मुलांसाठी मुंबईपुण्यासारख्या  शहरांमध्ये  रात्रशाळा तरी असतात.पण खेडोपाड्यांमध्ये मात्र जरी खूप मोठ्या प्रमाणावर शाळेत जाणारी मुलं - मुली शेतात दिवसभर राबत असली तरी त्यांच्यासाठी अशा निराळ्या शाळाही नसतात!
तुटपुंजी शेती असलेल्या घरांमध्ये किंवा भूमिहीन मजुरांच्या घरात आईवडिलांच्या बरोबरीने मुलांनी कामावर जाणे – ही गोष्ट सगळ्यांच्या इतकी अंगवळणी पडून गेलेली आहे की त्यात कोणालाच काही वावगं वाटत नाही! घरात पैशांची गरज इतकी तातडीची असते की शेतीच्या alt
कामांच्या मोसमात जितके हात कामाला लागतील तितके कमीच पडतात. शाळेत प्रवेश घेतलेला असला तरीदेखिल कामाच्या भारामुळे या मुलांना बरेचदा शाळा बुडवावीच लागते. अशी सतत शाळा बुडवावी लागली की अभ्यासात खंड पडत रहातो , मग शाळेची गोडी तरी कशी लागावी? मग बहुतेकजणांना अर्ध्यावरच शाळा सोडून द्यावी लागते . . . अनेक मुलींना तर घरकाम आणि शेतकामा सोबत वयाच्या १४-१५ व्या वर्षी लग्नाच्या संकटालाही तोंड द्यावे लागते. मोठ्या कुटुंबांमध्ये सासूच्या हाताशी घरकामाला कोणीतरी हवे म्हणून मुलाचे शिक्षण सुरू असतानाच त्याचे लग्न करून दिले जाते. लग्न झाल्यावर त्या मुलाचे शिक्षण जरी पुढे सुरू राहिले तरी मुलीचे शिक्षण मात्र कायमचे बंद होऊन जाते! ऊसतोडणी करणाऱ्या गरीब कुटुंबात जोडीने काम केल्यास जास्त पैसे मिळतात, म्हणून देखिल लहान वयात लग्न लावली जातात. कमी वयात लग्न होण्यातले धोके अणि त्रास समजत असले तरी; लग्नासाठीचा सामाजिक आणि आर्थिक दबाव इतका मोठा असतो की एकट्यादुकट्या मुलींनी त्याला विरोध करणे अतिशयच अवघड असते.
वर्षासारखी एखादीच जिद्दीची मुलगी सगळ्या विरोधाशी मुकाबला करून बारावीपर्यंत पोचू शकते! वर्षा खरात – शहापूर तालुक्यातली ही मुलगी. . .सात भावंडांचे मोठे कुटुंब – पण जेमतेम दीडएकर शेती! त्यामुळे लोकांच्या शेतावर जाऊन मजुरी करावी लागायची. . .  वर्षा लहानपणापासून कापसाच्या शेतावर रोजंदारीने काम करायला जात असे... पण वर्षाला शिकायची भारी आवड – हुशारीच्या बळावर दहावी पर्यंतचे शिक्षण तिने मजुरी करताकरताच पूर्ण केले! मग मात्र घरात तिच्या लग्नाचा विचार सुरू झाला. . . वर्षाला पाच बहिणी आहेत – तिच्यापेक्षा मोठ्या बहिणींची लग्न आईवडिलांनी १३-१४ व्या वर्षीच लावून दिली होती! पण वर्षाने मात्र लग्नाला साफ नकार दिला - “मला शिकू द्या”  - हा एकच धोशा तिने लावून धरला! जरी तिच्या हट्टापायी आईवडिलांनी काही काळ लग्न लांबणीवर टाकले. . . तरी त्यांनी तिला साफ सांगून टाकले – “तुम्हाला जेवायला घालायलाच आमच्याकडे पैसे नाहीत, शिकायचे असेल तर स्वत: पैसे कमव आणि तुझं तूच काय ते पहा!” वर्षा कष्टाला घाबरणारी मुलगी नव्हती - ती दररोज एक क्विंटल कापूस वेचायची आणि दिवसाला शंभर रुपये कमाई करायची! त्याच सुमारास शहापुरात युनिसेफ तर्फे “दीपशिखा वर्ग” सुरू झाले. शेतातल्या मैत्रिणींसोबत वर्षाही या वर्गांना हजर रहायला लागली. किशोरवयीन मुलींच्या आशा, आकांक्षांची उमेद वाढवणाऱ्या आणि आरोग्य,शिक्षण, व्यवसाय याविषयीची माहिती देनाऱ्या या वर्गांमुळे वर्षाला आणखीनच बळ मिळाले. तिची शिक्षणाची आवड आणि कष्टाची तयारी पाहून मदतीचे अनेक हात पुढे आले. आयत्या वेळी परिक्षेची फी भरायला पैसे कमी पडत होते तेव्हा मैत्रिणीनेच तिची फी भरली. ते पैसे फेडण्यासाठी ती परिक्षेच्या वेळेपर्यंत मजुरी करीत होती. अर्थातच परिणामी, तिला परिक्षेत अपयश आलं. . .! वर्षा पुन्हा प्रयत्न करेल, आणि तिला त्यात यश देखिल मिळेल पण वर्षासारख्या मेहनती मुलीचे अपयश हे खरंतर तुम्हाआम्हा सर्वांचं अपयश आहे असं मला वाटतं!
महाराष्ट्रासारख्या ’पुढारलेल्या’ राज्यात वर्षासारख्या असंख्य मुलांना आपला उमेदीचा काळ शिक्षणाऐवजी असा अतोनात कष्टात खर्च करावा लागतो आहे, त्यांच्या विकासाच्या संधी त्यांच्याकडून हिरावून घेतल्या जाताहेत – केवळ कायदे करून त्यांचे प्रश्न सुटतील का? त्यांचे वैयक्तिक नुकसान हे एकप्रकारे आपले सर्वांचे नुकसान आहे असे आपल्याला कधी जाणवते का?