मोठ्यांनी जबाबदारी घ्यायला हवी! Print

alt

युनिसेफ प्रतिनिधी, शुक्रवार, १५ जून २०१२
गेल्या तीन दिवसांपासून प्रसिद्ध होणा-या या लेखमालेतले लेख वाचणा-या अनेक मंडळींनी मला प्रश्न केला आहे की, जर सरकारने बालमजुरीविरोधी कायदा केलेला आहे आणि ब-याच संस्था गावोगावी या विषयावर काम करीत आहेत, तरीही आपल्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बालमजुरी का सुरू रहाते? भारतात १७ दशलक्ष मुले बालमजुरी करतात यावर अनेक मध्यमवर्गीय माणसांचा मुळी विश्वासच बसत नाही.

मुंबईसारख्या महानगरांमध्ये सिग्नलवरती पुस्तके विकणारी, ऑफिसमध्ये चहा पोचवणारी, घरेलू कामगार म्हणून काम करणारी किंवा धाब्यांवरती लहानमोठी कामे करणारी मुलेच फक्त आपल्याला दिसतात. . .पण त्याहीपलिकडे आपल्यासारख्या माणसांना कल्पनादेखिल करता येणार नाही असं भयानक आयुष्य कधीकधी छोट्याछोट्या खेडेगावांमधल्या लहान मुलांच्या वाट्याला येत असतं. युनिसेफ सारख्या संस्थेच्या वतीने बालहक्कांच्या प्रश्नांवर काम करीत असताना परिस्थितीने नाडलेली अनेक लहान मुलं भेटतात.
यवतमाळ जिल्ह्यातल्या राजेशला भेटून मन सुन्न होवून गेले. जेमतेम १४ वर्षांचा हा मुलगा – नऊ जणांच्या भल्यामोठ्या कुटुंबाचा भार वहातोय.... कारण वडील व्यसनी आणि आई सतत आजारी !  राजेशने तिसरीतूनच शाळा सोडून दिलेली आहे. गावातले पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, शाळेचे मुख्याध्यापक, उपसरपंच अशा सगळ्यांनी प्रयत्न करूनही राजेश शाळेत जायला अजिबात तयार नाही. पण राजेशने कमावले नाही तर त्याच्या सातही धाकट्या भावंडांना उपाशी रहावे लागेल... अशा परिस्थितीत राजेशचे मन शिक्षणात कसं लागेल?
राजेशपेक्षा थोडिशी वेगळी परिस्थिती आहे – मांगुळ गावातल्या समाधानची. नव-याच्या मारहाणीला कंटाळून समाधानच्या आईने गाव सोडले आहे. समाधान ने पुढे शिकायला हवे असे तिला मनापासून वाटते; पण त्याच्या शाळेचा दाखला वडील त्यांना मिळू देत नाहीत. . .त्यामुळे समाधानला नवीन गावी शाळेत प्रवेश मिळत नाहीये. नाईलाजाने तो हॉटेलमध्ये काम करायला लागला आहे.
शीतलची कहाणी तर आणखीनच निराळी आहे... शितलची आई वारल्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि ते तिच्या तिनही भावंडाना वाऱ्यावर सोडून दुसरे घर थाटायला गावातून निघून गेले. त्यावेळी शीतल सातव्या इयत्तेमध्ये शिकत होती... तिच्यापेक्षा मोठी बहीण आणि भाऊ दोघंही मजुरीला लागले... आणि शीतलने कसेबसे सातवीचे वर्ष पार पाडले. पण या तिघा भावंडांचे पोट भरेल इतकी कमाईदेखिल होत नव्हती. त्यांच्याकदे नाजमीन ना इतर काही उत्पनाचे साधन – त्याच्याकडे दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दाखला देखिल नाही. अशा बिकट परिस्थितीमध्ये शाळेत जायची चंगळ त्यांना कशी परवडणार?
शीतल, समाधान आणि राजेश सारखी अनेक मुले गावोगावी दिसून येतात. . . बरेचदा गावांमधले कार्यकर्ते अशा मुलांच्या समस्यांपुढे हतबल होऊन जातात. लहान मुलांपुढे अशा समस्याच उभ्या राहू नयेत याची जबाबदारी आपण मोठ्या माणसांनीच घ्यायला हवी ना?