अजय कांडर यांच्या ‘हत्ती इलो’ काव्यसंग्रहाचे ६ ऑक्टोबरला प्रकाशन Print

वार्ताहर, सावंतवाडी
कवी अजय कांडर यांच्या ‘हत्ती इलो’ या काव्यसंग्रहाचे येत्या ६ ऑक्टोबर रोजी अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कवी वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. सिंधुदुर्ग साहित्य संघ आणि श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा. श्रीराम वाचन मंदिरमध्ये कार्यक्रम होणार आहे. कवी अजय कांडर यांच्या शब्द पब्लिकेशन, मुंबईतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या हत्ती इलो या दीर्घ काव्यसंग्रह प्रकाशनाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कांडर यांचा ‘आवानओल’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर आठ वर्षांनी त्यांचा हा दीर्घ कवितेचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. यावेळी समीक्षक, शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रपाठक डॉ. रणधीर शिंदे, कवी डॉ. गोविंद काजरेकर उपस्थित राहणार आहेत. हत्ती इलोमधील कविता प्रारंभी ऐवजी, मुराळी या वाङ्मयीन नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाली. हत्ती हे रुपक घेऊन आजची समाजव्यवस्थाच उद्ध्वस्त होत असल्याचे निर्देश करते. मराठीत दीर्घ कविता सातत्याने लिहिली गेली असली तरी विशिष्ट प्रदेशाच्या लोकजीवनावर आधारित होऊन ते लोकजीवनच संपुष्टात आल्याची तीव्र वेदना प्रथमच ‘हत्ती इलो’ कवितेच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.
समकालाचा मागोवा ही कविता घेत असल्याने ती या ठराविक लोकजीवनाला ओलांडून अनुभव आणि जाणीव, व्यापक होत जाते. तसेच वाचकाला ती समग्रपणे भिडून आतून ढवळून काढते. कवी अजय कांडर यांच्या या हत्ती इलो काव्यसंग्रह प्रकाशनप्रसंगी त्यांच्या आवानओल या कविता संग्रहातील कविता पाठय़पुस्तकात समाविष्ट झाल्याबाबतही सत्कार केला जाईल.