सिंधुदुर्गमध्ये जंगली हत्तींचा धुमाकूळ; शेतीचे नुकसान Print

वार्ताहर , सावंतवाडी
भातकापणीचा हंगाम सुरू होताच जंगली हत्तींचा वावर वाढू लागला. सावंतवाडी शेजारील कारीवडे व चराठे भागांत भातशेती तुडवत इन्सुली भागात पोहोचलेल्या चार हत्तींनी डेगवे, डिंगणे भागांत आपला मुक्काम केल्याची शक्यता वनखात्याने व्यक्त केली. गेल्या दहा वर्षांच्या काळात कोटय़वधीची नुकसानी करणाऱ्या हत्तींचा वावर पुन्हा एकदा सुरू झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील दोडामार्ग-मांगेली भागात हत्ती सर्वप्रथम २००० मध्ये कर्नाटकातील दांडेली अभयारण्यातून आले. त्या काळात सुमारे २३ हत्तींचा कळप आला होता. सुरुवातीच्या काळात मोठय़ा संख्येने हत्तींचा वावर वाढल्याने हाहाकार उडाला होता. हत्तींचा वावर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ व मालवण तालुक्यांतील जंगलमय भागात वाढला होता. त्यानंतर हत्ती हटाव मोहीम, खंदक, मिरचीपूड दोरी अशा अनेक योजना करण्यात आल्या, पण या योजनांना हत्तींनी दाद दिली नाही. गेले काही महिने कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात हत्तींनी मुक्कामच ठोकला होता. त्यांचा वावर माणगाव खोऱ्यात वाढला. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत सावंतवाडी शेजारील कारीवडे, चराठे, ओखणे भागांत हत्तींचा वावर सुरू झाला. हे हत्ती आता डेगवे किंवा शिंगणे भागाकडे आगेकूच करत आहेत, असे वन विभागाकडून सांगण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात २००६ ते २०११ पर्यंत शेतकऱ्यांना नुकसानीच्या पाच हजार ७९२ प्रकरणांतून ७ कोटी ६८ लाख २७ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. भात, नारळ अशा विविध कृषी नुकसानीस हत्तींनी माणसांना ठार व जखमी करणाऱ्यांनाही भरपाई देण्यात आली आहे. भातकापणीच्या हंगामात हत्तीच्या वावराने शेतकरी भीतीच्या छायेखाली वावरू लागले आहेत.