वन्यप्राण्यांच्या लोकवस्तीतील वावरामुळे शेतकरी-बागायतदारांचे अतोनात नुकसान Print

वार्ताहर , सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात वन्यप्राणी शेतकरी-बागायतदारांची प्रचंड नुकसानी करत असूनही शासन किंवा लोकप्रतिनिधी त्याकडे डोळसपणे पाहात नाहीत. त्यामुळेच शेतकरीवर्गाची मेहनत मातीत मिळत असल्याचे बोलले जाते. गेल्या पाच ते सहा वर्षांत हत्ती, गवारेडे, माकड या सर्वानी मिळून दहा ते पंधरा कोटींची नुकसानी केली आहे.
जंगली हत्ती ही संपत्ती खरे तर कर्नाटकची आहे, पण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व कोल्हापुरातील चंदगडमध्ये कोल्हापुरातील हत्तींचा वावर वाढल्याने ते महाराष्ट्राचे झाले आहेत.
पश्चिम घाट म्हणजेच सह्य़ाद्री घाटाच्या सान्निध्यात बिबटय़ा, गवारेडे, माकड, रानडुक्कर, हरण, अस्वल अशा विविध प्रकारचे वन्यप्राणी वावरत आहेत. जंगलात वृक्षतोडीचे वाढलेले प्रदूषण आणि केरळी लोकांचा वावर पाहता जंगलातील प्राणी लोकवस्तीत घुसत आहेत असे म्हणण्यास अधिक वाव आहे, असे बोलले जाते.
वन्यप्राण्यांमुळे सह्य़ाद्रीच्या पायथ्याशी असणारी शेतीच शेतकरी करत नाहीत. जंगलात वन्यप्राण्यांना अन्न मिळत नाही. त्यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीत घुसून शिकार करत आहेत किंवा शेती-बागायतीची नुकसानी करत असल्याचे सांगण्यात येते.
डोंगरदऱ्यात वन्यप्राण्यांची वसतिस्थानात मनुष्याने धुडगूस घालण्यास प्रारंभ केला असल्याने माकड, गवारेडे बागायती, शेतीचे नुकसान करत आहेत.
जंगली हत्तींच्या आगमनामुळे सन २००६-०७ मध्ये ८४३ जणांचे १४३.८९ लाख रुपयांचे नुकसान केले. सन २००७-०८ मध्ये ही नुकसानी १५१० जणांची १५०.३२ लाख रुपयांची केली म्हणजेच हत्तींचा त्रास वाढतच होता. त्यानंतर सन २००८-०९ मध्ये १४७७ जणांचे २०६.३७ लाख रुपयांचे हत्तींनी नुकसान केले.
या पहिल्या तीन वर्षांत हत्तींनी मोठय़ा प्रमाणात शेतकरी व बागायतीची नुकसानी केली, माणसांना चिरडले व जखमीही केले. त्यामुळे ‘हत्ती हटाव’ कार्यक्रम शासनाला हाती घ्यावा लागला. अखेर हत्ती हटावला बगल देत हत्तींना नैसर्गिक अधिवासात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर सन २००९-१० मध्ये २८८ प्रस्ताव ७.६२ लाख, सन २०१०-११ मध्ये पुन्हा १०२३ प्रस्ताव १२७.११ लाख, सन २०११-१२ मध्ये ५९९ प्रस्ताव ६४.४७ लाख आणि सन २०१२-१३ मध्ये ५२५ प्रस्ताव ४.१२ लाख रुपयांची नुकसानी हत्तींनी केली.
सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, मालवण व कुडाळ तालुक्यातील जंगलमय भागात सन २००६ ते २०१२ पर्यंत पाच हजार ७९२ नुकसानीचे प्रस्ताव दाखल झाले. त्यांना ७ कोटी ६८ लाख २७ हजार रुपयांची भरपाई देण्यात आली. प्रत्यक्षात ही भरपाई १५ कोटींपर्यंत पोहोचणारी आहे. हत्तींनी नारळाच्या झाडांचे नुकसान केले. त्यामुळे पुन्हा तेथे नारळ झाड शेतकऱ्यांनी लावलेच नाही. भातशेतीची भरपाई देण्यात आली, पण बागायतीची नुकसानी शेतकऱ्यांसमोर चिंता करणारी ठरली आहे.
हत्तीपाठोपाठ गवारेडय़ांनी लोकांना सन २००६ पासून त्रास देण्यास सुरुवात केली. या वर्षी नुकसानीच्या ५१ प्रस्तावांत २१ हजार, सन २००७ मध्ये ६२ प्रस्तावांना ५१ हजार, सन २००८ मध्ये ३३ प्रस्तावांना ३३ हजार १८० रुपये, सन २००९ मध्ये २६० रुपये, सन २०१२ मध्ये १७ प्रस्तावांना सात हजार २१० रुपये, सन २०११-१२ मध्ये २६२ प्रस्तावांना ६ लाख ७४ हजार ६४६ रुपये भरपाई दिली. म्हणजेच हल्ली गवारेडय़ांनी सन २००६ ते २०१२ पर्यंत ४२६ जणांची ७ लाख ८७ हजार १९६ रुपयांची नुकसानी करून शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे.