उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचे दोन बळी Print

प्रतिनिधी, नाशिक
काही दिवसांपासून अंतर्धान पावलेल्या पावसाने दोन ते तीन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याने एकिकडे पाणी टंचाईची तीव्रता कमी होणार असली तरी वादळी पावसाने दोन जणांचा बळी घेतला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे वीज कोसळल्याने दोन जण ठार झाले. वादळामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तसेच दूरध्वनी खांबांचे नुकसान झाल्याने विद्युत व दूरध्वनी व्यवस्था कित्येक तास विस्कळीत झाली.
सोमवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. त्यानंतर मंगळवारी सायंकाळीही पावसाने झोडपले. पावसामुळे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर वीज वाहिन्या प्रभावित झाल्या. उत्तर महाराष्ट्रातील चाळीसगाव परिसरालाही सलग दोन दिवस वादळी पावसाने तडाखा दिला. तालुक्यातील शिंदवाडी येथील ममता शिवाजी पाटील (४०) या शेतातून घरी परतत असताना अंगावर वीज पडल्याने ठार झाल्या. पिंप्री येथील शिवाजी वामन पाटील (३५) हे शेतात काम करत असताना वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील हरसूलजवळील जातेगाव खुर्द येथे वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाला.