अबु जुंदालला न्यायालयीन कोठडी Print

प्रतिनिधी,  नाशिक
साधारणत: दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, तोफखाना स्कूल व पोलीस आयुक्तालयाची रेकी करून घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याच्या प्रकरणात अटकेत असणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी अबु जुंदालची २४ दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातील अन्य संशयित शेख लालबाबा मोहंमद हुसेन उर्फ बिलाल आणि हिमायत बेग यांची साक्ष नोंदविण्याचे कामही सुरू झाले आहे.
देशभरातील बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून प्रथम बिलालला शिवाजीनगर भागातून अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे ७०० ग्रॅम आरडीएक्स, ४ डिटोनेटर्स, ३ पॅनकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, अमेरिकन चलन, छायाचित्र आणि चित्रीकरण कॅमेरा, पेन ड्राईव्हसह आक्षेपार्ह कागदपत्रे मिळून आली होती. नाशिक, पुणे व मुंबई शहरांची रेकी करणाऱ्या बिलालने दुबई व कतारमार्गे पाकिस्तानात जावून सांकेतिक भाषेत माहिती पाठविण्याच्या तंत्राचे प्रशिक्षण घेतले होते. जर्मन बेकरी प्रकरणी अटकेत असणाऱ्या हिमायत बेग आणि बिलाल दरम्यान वारंवार संभाषण झाल्याचे तपासात पुढे आले. या दोन्ही संशयितांच्या चौकशीत त्यांचे अबु जुंदालशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले. सय्यद सबुद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदाल याला या प्रकरणात सलग दोन वेळा एकूण २४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या पोलीस कोठडीची मुदत संपुष्टात आल्यावर जुंदालसह शेख लालबाबा व बेगला न्यायालयात हजर करण्यात आले.
 या स्वरूपाच्या गुन्ह्यात २९ दिवस पोलीस कोठडी घेता येते. जुंदालची उर्वरित सात दिवसांच्या पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवण्याची विनंती विशेष सरकारी वकिल अजय मिसर यांनी न्यायालयास केली. न्यायालयाने जुंदालला १७ ऑक्टोबपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले, अशी माहिती मिसर यांनी दिली. दरम्यान, याच प्रकरणातील अन्य संशयित बेग व बिलालची साक्ष नोंदविण्याचे कामही सुरू झाले आहे.