संमेलनाच्या यशस्वितेसाठी कलाकार-उद्योजक संघटित Print

साहित्य संमेलनपूर्व कार्यक्रमाचे उद्घाटन
खास प्रतिनिधी, रत्नागिरी
चिपळूण येथील आगामी ८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्जनशील कलाकार आणि उद्योजक संघटित झाल्याचे चित्र साहित्य संमेलनपूर्व कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना बघावयास मिळाले.चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या सभागृहात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध चित्रपट निर्माते-कला दिग्दर्शक नितीन देसाई, सर्जनशील संगीतकार कौशल इनामदार, उद्योजक महेश नवाथे, संजय भुस्कुटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना या सर्वानीच हे संमेलन अभूतपूर्व आणि संस्मरणीय करण्याची ग्वाही दिली. देसाई यांनी नियोजित संमेलननगरीचा रंगीत आराखडा या वेळी सादर केला. अस्सल कोकणी गावाची उभारणी या ठिकाणी होणार असून त्यासाठी कोकणातील नैसर्गिक साहित्य वापरण्यात येणार आहे. नारळी-पोफळीच्या झावळ्या, शेणाने सारवलेली झोपडी, अंगणात सुरेख रांगोळी इत्यादी कोकणच्या लोकसंस्कृतीचे बारकावे या नगरीत पाहुण्यांना बघायला मिळणार आहेत आणि त्यातूनच संमेलनाचे व्यासपीठ, उपाहारगृह, बठकीची खोली इत्यादी सुविधा साकारणार आहेत. या सर्व बाबींमुळे संमेलनाला खास कोकणी बाज लाभेल, असा विश्वास व्यक्त करून नितीन देसाई म्हणाले की, मला या मातीने, संस्कृतीने इतके काही दिले आहे की त्याची थोडा उतराई होण्याचा प्रयत्न संमेलननगरीच्या उभारणीद्वारे मी करणार आहे. या कोकणाच्या निसर्गाचे असे वैशिष्टय़ आहे की, येथे स्वित्र्झलड आणि अमेरिकेतील कोलारॅडो ही दोन्ही अनुभवायला मिळते. नगरीच्या उभारणीसाठी शक्य तेथे स्थानिक कारागीर आणि कष्टकऱ्यांना सहभागी करून घेणार असल्याचेही देसाई यांनी नमूद केले.
सध्या मराठी भाषा आणि साहित्याच्या दुरवस्थेबाबत वारंवार बोलले जाते, पण ही परिस्थिती बदलायची असेल तर शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठीची गोडी निर्माण करायला हवी, असे मत व्यक्त करून प्रयोगशील संगीतकार कौशल इनामदार म्हणाले की, मराठी अभिमान गीताप्रमाणेच कवी माधव यांनी रचलेले ‘सह्य़ाद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण’ हे कोकण गीत या संमेलनाच्या प्रसंगी चिपळुणातील शाळकरी विद्यार्थ्यांकडून गाऊन सादर करण्याचा माझा मनोदय आहे. त्यासाठी येथील शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. अशा प्रकारे शालेय पातळीवरच अभिजात मराठी कवितांची गोडी विद्यार्थ्यांना लागली तर त्यांच्याकडून या साहित्याचे आयुष्यभर जतन होईल, असा विश्वासही इनामदार यांनी व्यक्त केला.
येथील प्रसिद्ध उद्योजक महेश नवाथे यांनीही याप्रसंगी बोलताना शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचे संस्कार उत्तमपणे रुजवण्याची गरज प्रतिपादन केली, तर संजय भुस्कुटे यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे सहकार्य घेण्याचा मनोदय व्यक्त केला. या सर्व बाबींप्रमाणेच संमेलन यशस्वी करण्यासाठी निधीची गरज असल्याचा मुद्दाही सूत्रसंचालक धनंजय चितळे यांच्यासह सर्वानी अधोरेखित केला आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांचे आश्वासन दिले.
दरम्यान, याच संमेलनपूर्व कार्यक्रमांचा एक भाग म्हणून मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकामध्ये खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कोकणातील ज्येष्ठ साहित्यकार कै. श्री. ना. पेंडसे, चरित्रकार कै. धनंजय कीर, महाराष्ट्राच्या साहित्य-संस्कृतीची जपणूक करणारे ज्येष्ठ नेते कै. यशवंतराव चव्हाण यांची यंदा जन्मशताब्दी, तर मराठी पत्रकारितेचे प्रणेते कै. बाळशास्त्री जांभेकर यांची द्विजन्मशताब्दी आहे. त्यानिमित्त आगामी तीन महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्य़ात खास व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. या मालिकेचा शुभारंभ पत्रकार राजेंद्र मसुरकर यांच्या व्याख्यानाने झाला. मालगुंड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नाना मयेकर, मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, संमेलन संयोजन समितीचे कार्यवाह बापूसाहेब काणे, अरुण इंगवले, वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद जाधव  हे या प्रसंगी उपस्थित होते.