श्रीराम विद्यालयात ‘यशस्वी भव’ पुस्तिकांचे वितरण Print

रत्नागिरी  

रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील श्रीराम विद्यालय व तु. पुं. शेटय़े कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘यशस्वी भव’ या दहावीच्या अभ्यासाने परिपूर्ण पुस्तिकेच्या वितरणाचा समारंभ पार पडला. या प्रसंगी वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मारुती डोळस ऊर्फ दादा उपस्थित होते.
या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाला मदत व्हावी म्हणून गेली पाच-सहा वर्षे सातत्याने ‘लोकसत्ता’ या वर्तमानपत्राचे वितरण केले जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला रोजचा पेपर मिळत असल्याने त्यांच्या सामान्यज्ञानात भर पडत आहे.

हे पेपर देण्याचे औदार्य या विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुरेश बोडस करीत आहेत. निस्पृहता, औदार्य व सामाजिक बांधीलकी या गुणांचा संगम असलेले हे व्यक्तिमत्त्व आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यांनी हे काम सातत्याने चालू ठेवले आहे. दहावीचा समग्र अभ्यासक्रम असलेली ‘यशस्वी भव’ पुस्तिकासुद्धा त्यांच्याकडूनच दिली जाते.
या छोटेखानी वितरण समारंभास विद्यालयाच्या ज्युनि. कॉलेज विभागाचे व्याख्याते डॉ. पिसे, श्री. कुलकर्णी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. बी. पाटील व शिक्षक श्री. बेर्डे व श्री. डोळे उपस्थित होते.