कोकणात साखरचौतीच्या गणपतींचे आगमन Print

प्रतिनिधी, अलिबाग

कोकणात ठिकठिकाणी आज साखरचौतीच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अलिबाग, पेण, पनवेल, उरणमध्ये वाजतगाजत मोठय़ा उत्साहात लाडक्या गणपतीचे आगमन करण्यात आले. या गणपतीचा पुराणात काही इतिहास आढळत नसला तरी अलीकडच्या कोकणात साखरचौतीचा गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. भाद्रपद महिन्यातील मुख्य गणेशोत्सव संपल्यानंतर येणाऱ्या वद्य चतुर्थीला या गणपतींची स्थापना केली जाते. कुठे दीड दिवस, तर कुठे पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. कोकणात घराघरांत गणेशोत्सव साजरे होत असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव फारसे साजरे होत नाहीत.

ही बाब लक्षात घेऊन सगळ्यांना एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करता यावा म्हणूनही या साखरचौतीच्या गणपतीची स्थापना होऊ लागली आहे. अगदी अलीकडच्या काळात पेण, अलिबाग, पनवेल, उरण या तालुक्यांत साखरचौतीच्या सार्वजनिक गणपतीचे प्रस्थ वाढत असल्याचे दिसून आले आहे. भव्य मिरवणुका, आकर्षक सजावट करून या साखरचौतीच्या गणपतीची स्थापना करणे ही आता या गणेशोत्सवाची ओळख बनू लागली आहे.

या गणेशोत्सवाला गणेश मूर्तिकारांचा गणेशोत्सव असेही संबोधले जाते. विशेषत: पेण तालुक्यात तीनशे ते चारशे साखरचौतीचे गणपती बसवले जातात. वर्षभर गणेशमूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना मुख्य गणेशोत्सव साजरा करता येत नाही. अशा वेळी ते साखरचौतीचे गणपती बसवतात. गणेशाची आराधना केल्यावरच त्यामुळे पुढील वर्षांच्या मूर्तिकामाला सुरुवात करत असतात. उत्तर कोकणात साखरचौतीच्या नावाने ओळखल्या  जाणाऱ्या या गणपतींना तळकोकणात गौरा गणपती म्हणूनही संबोधले जाते.