बंधाऱ्याच्या जलपूजनप्रसंगी मालेगाव सेना-मनसेत घोषणायुद्ध Print

वार्ताहर, मालेगाव

तालुक्यातील चिंचावड येथे शिवसेनेचे सचिव आ. विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या जलपूजनप्रसंगी बुधवारी शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध रंगल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. बंधाऱ्याचे काम अपूर्ण असल्यामुळे लाभक्षेत्रातील तीन गावांच्या ग्रामसभांनी विरोध केल्यावरही शिवसेनेतर्फे घाईघाईत जलपूजनाचा हा कार्यक्रम रेटण्यात आल्याचा आरोप मनसेने केला असून, आ. दादा भुसे यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. काही विघ्नसंतोषी मंडळींनी स्थानिक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरविल्याचा आरोप करतानाच चांगल्या कामात खोडा घालणाऱ्यांना तशाच पद्धतीने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही भुसे यांनी दिला.

गिरणा नदीवर सिद्धेश्वर मंदिराजवळील या बंधाऱ्याचे काम लघु पाटबंधारे खात्याच्या स्थानिक स्तर विभागामार्फत करण्यात आले. दोन कोटी ४९ लाखांच्या या बंधाऱ्याचे जलपूजन आ. राऊत यांच्या हस्ते आणि आ. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. हे काम निकृष्ट असल्याची तक्रार करतानाच ते अजून अपूर्ण आहे व पूर्ण केल्यावरच त्याचे जलपूजन व्हावे, असा काही स्थानिक लोकांचा आग्रह होता. आघार खुर्द, आघार बुद्रुक व चिंचावड येथील ग्रामसभांनी या जलपूजन कार्यक्रमास त्यामुळे विरोध दर्शविला. मात्र विरोधाला न जुमानता हा कार्यक्रम पार पाडल्याने स्थानिक शेतकरी व मनसेच्या कार्यकर्त्यांनी विरोधात घोषणाबाजी केली. प्रत्युत्तरादाखल शिवसैनिकांनीही घोषणा दिल्या. स्थानिक शेतकरी व शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली.
जलपूजन समारंभात बोलताना आ. भुसे यांनी बंधाऱ्याच्या कामात कशा अडचणी येत होत्या व त्यांची आपण कशी सोडवणूक केली, याची माहिती दिली. २००५ मध्ये या कामास मंजुरी मिळाली, तरी तुटीच्या असलेल्या खोऱ्यात पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने हे काम रखडले होते. पाटबंधारे खात्याने त्यासंबंधी ना हरकत दाखला दिल्यानंतर २००९ मध्ये हे काम सुरू झाले. अवघ्या दोन वर्षांत हे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा करताना नजिकच्या काळात गिरणा नदीवर अशाच प्रकारे आणखी तीन व मोसम नदीवर पाच बंधारे बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आ. राऊत यांनी केंद्र व राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकारमधील लोकांचा भ्रष्टाचार सुरू असून अशा कपाळकरंटय़ांना जलसमाधी देण्यास लोकांनी आता सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आ. भुसे यांच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. या प्रसंगी पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता सुनील प्रदक्षिणे, शिवसेनेचे जयंत दिंडे, कारभारी आहेर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, अ‍ॅड. संजय दुसाने आदी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.