विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी कारवाईसाठी येवल्यात मूक मोर्चा Print

येवला
भाजल्यावर तातडीने उपचार मिळू न शकल्याने येथील माया चौधरी यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यास कारणीभूत असलेल्यांविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी नायब तहसीलदारांच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. संशयितांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार विनायक थविल यांना देण्यात आले.
१५ सप्टेंबर रोजी माया चौधरी या राहत्या घरी गंभीररीत्या भाजल्या होत्या, परंतु त्वरित उपचार होऊ न शकल्याने त्यांचा अखेर मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरुवारी या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ५०० महिलांनी शहरातून मूक मोर्चा काढला. तिच्या मृत्यूस कारणीभूत प्रसाद चौधरी (पती), मुलगा सचिन, सून अर्पिता, सासू विमल, दीर शाम व वैशाली यांच्याविरुद्ध विवाहितेचा भाऊ प्रफुल्ल पटेल यांनी गुन्हा दाखल केला आहे.
 संशयितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप नेते धनंजय कुलकर्णी, यतीन पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे. आठ दिवसांत संशयितांना कठोर शिक्षा न झाल्यास पोलीस ठाण्यात उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेच्या ज्योती सुपेकर यांनी दिला आहे.