राष्ट्रवादीनेच ‘तेरणा’ कारखाना बंद पाडला - ओम राजेनिंबाळकर Print

उस्मानाबाद
ऊस बिलाचा उर्वरित ३०० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना देता येऊ नये व तेरणा कारखान्याच्या संचालकांची बदनामी होऊन ते अडचणीत यावेत, यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने कामगारांना हाताशी धरून मागील अडीच महिन्यांपासून कारखाना बंद पाडला असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केला.
३७ महिन्यांचे थकीत वेतन मिळावे म्हणून तेरणा साखर कारखान्यातील कामगारांनी बुधवारी कारखान्याच्या अध्यक्षा आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या घरावर मोर्चा काढला होता. त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी  गुरुवारी पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले, की ‘३७ महिन्यांपैकी २९ महिन्यांचे थकीत वेतन मागील संचालक मंडळाच्या काळातील आहे. माझ्या कार्यकाळातील केवळ साडेआठ महिन्यांचे वेतन थकीत आहे. शासनाच्या २००१ च्या अध्यादेशानुसार कर्मचाऱ्यांना १५ टक्के वेतनवाढ मागील संचालक मंडळाने देणे अपेक्षित होते. ही वाढ २००९ पासून कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे प्रतिमहा नऊ लाख रुपयांचा अतिरिक्त बोजा कारखान्यावर पडला. त्यापोटी कारखान्याने २ कोटी ६१ लाख रुपये आजपर्यंत अदा केले आहेत. कारखान्यातील ८९ हंगामी कर्मचाऱ्यांना कायम केले. ४५० कर्मचाऱ्यांचे ग्रेडेशन वाढविले आहे. त्यामुळे प्रतिमहा चार लाख रुपये याप्रमाणे १ कोटी १६ लाख रुपये आगावू रक्कम कर्मचाऱ्यांना द्यावी लागली. ३ कोटी ७७ लाख रुपये अधिक वेतन कर्मचाऱ्यांना दिले.’
१५ टक्के वेतनवाढ केली नसती, तर कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे वेतन देखील शिल्लक राहिले नसते, असे सांगून ज्यांच्याकडे २९ महिन्यांचे वेतन थकले, त्यांच्या विरोधात कामगारांनी एकदाही आंदोलन का केले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कामगार आजपासून कामावर यायला तयार असतील, तर कारखान्यातील भंगार विकून त्यांची देणी देऊ, भले त्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागला तरी चालेल. कामगारांनी हा संप पोटासाठी सुरू केला असेल, तर अडीच महिने कारखाना बंद ठेवून काय मिळविले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचा ३०० रुपयांचा हप्ता देता येऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संचालक मंडळाची कोंडी केली जात आहे. ऐन गळीत हंगामाच्या तोंडावरच कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संपाचे हत्यार वापरले जात आहे. परंतु कारखाना बंद पडल्याने कोणाचेच हित साध्य होणार नाही. परिणामी भोगावती, किल्लारी, तुळजाभवानी या कारखान्यांची जी गत झाली तीच तेरणेची देखील होईल. त्यामुळे शेतकरी सभासदांचे हित लक्षात घेऊन कामगारांनी कामावर यावे. भंगार विकून दोनच काय, थकीत सर्व वेतन देण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यासाठी कारखाना सुरू होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.