पिंपरीत मंदीमुळे जकात उत्पन्नाला फटका Print

वर्षभरासाठी टार्गेट १३०० कोटींचे; सहा महिन्यांत ५८४ कोटी
प्रतिनिधी , पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘श्रीमंती’ अवलंबून असणाऱ्या जकात विभागाला सध्याच्या औद्योगिक मंदीचा फटका बसू लागल्याचे चित्र पुढे आले आहे. वर्षभरासाठी १३०० कोटींचे उद्दिष्ट ठरवून दिलेल्या जकात विभागाने सहा महिन्यांच्या कालावधीत ५८४ कोटी रुपये म्हणजे अपेक्षेपेक्षा ६६ कोटी रुपये कमी उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे उर्वरित सहा महिन्यांमध्ये तब्बल ७१६ कोटी रुपये मिळवण्याचे अवघड आव्हान जकातीसमोर आहे. अ‍ॅटोमोबाइल क्षेत्रातील मंदीचा उद्योगनगरी असलेल्या िपपरी-चिंचवडला फटका बसू लागला आहे. सर्वाधिक जकात उत्पन्न  मिळवून देणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीकडून महिन्याला अपेक्षेपेक्षा १० कोटी रुपये कमी उत्पन्न मिळाले आहे. त्याचपद्धतीने वाहन उद्योग क्षेत्रातील अन्य कंपन्यांची अवस्था आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना जकात विभागाकडून तब्बल १३०० कोटी रुपये मिळतील, असे अपेक्षित धरण्यात आले.
मागील तुलनेत हा आकडा खूपच मोठा होता. मात्र, जकात अधीक्षक अशोक मुंढे यांच्या नेतृत्वाखाली जकात टीमवर विश्वास व्यक्त करत वाढीव उद्दिष्ट देण्यात आले. आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांत ५८४ कोटी रुपये मिळाले आहे.
वास्तविक हा आकडा ६५० कोटी रुपये अपेक्षित होता. ३१ मार्च २०१३ पर्यंत १३०० कोटी उत्पन्न  मिळवायचे आहे. मंदीची परिस्थिती अशीच राहिली, तर उत्पन्नाचा आकडा बऱ्यापैकी खालीच राहणार आहे. तसे झाल्यास महापालिकेचे आर्थिक नियोजन बऱ्यापैकी बिघडणार असल्याचे उघड चित्र आहे.