व्यापारी-माथाडी कामगारांच्या वादात नाशिकमध्ये कांदा लिलाव ठप्प Print

प्रतिनिधी,नाशिक

कांदा विक्री प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक काटय़ावर केलेल्या वजनाच्या पावतीचा क्रमांक टाकण्याच्या मुद्यावरून व्यापारी व माथाडी कामगार संघटना यांच्यात निर्माण झालेल्या वादंगात गुरूवारी दुपारपासून नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा लिलाव प्रक्रिया ठप्प झाली. माथाडी कामगार संघटनांनी व्यापाऱ्यांची मागणी धुडकावत आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे अनिश्चित काळासाठी हे लिलाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या संदर्भात नऊ ऑक्टोबरला कामगारमंत्र्यांसमवेत व्यापारी, माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होणार असून त्यात काही तोडगा निघू शकेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, या घडामोडींचा उन्हाळ कांद्याला अपेक्षित भाव नसताना आणि चाळीत साठविलेला कांदा खराब होत असताना लिलाव ठप्प झाल्याचा फटका उत्पादकांसह ग्राहकांनाही सोसावा लागणार आहे.
बाजार समितीतील शेतमालाचे इलेक्ट्रॉनिक काटय़ावर वजन झाल्यावर त्या वे ब्रीजच्या पावतीचा क्रमांक काटा पावतीवर टाकल्याशिवाय माल खरेदी न करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता. मात्र, लिलाव सुरू झाल्यानंतर कामगारांनी त्यास विरोध केला. यामुळे गेल्या आठवडय़ातही लासलगाव बाजार समितीत तीन दिवस लिलाव बंद राहिले होते. याच कारणावरून पुन्हा शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी लिलाव बंद पडणार आहेत. पिंपळगाव बाजार समितीत यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. गुरूवारी या बाजार समितीत १० हजार ४७० क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. माथाडी कामगार व व्यापाऱ्यांच्या वादात लिलाव बंद पडू नये म्हणून बाजार समितीने कर्मचाऱ्यांच्या मदतीने या दिवशी लिलाव प्रक्रिया पूर्णत्वास नेली. या कांद्यास प्रती क्विंटल सरासरी ५२५ रूपये भाव मिळाला. लिलावास माथाडी कामगारांनी आक्षेप घेत अडथळे आणण्याचा इशारा दिल्याने अखेर शुक्रवारपासून ते लिलाव बंद राहणार असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले.
प्रत्यक्षात तोलाईचे काम न करता त्याची जी रक्कम घेतली जाते, त्यात इलेक्ट्रॉनिक वजन काटय़ाची नोंद केल्यास अडचणी निर्माण होतील अशी माथाडी कामगारांना धास्ती आहे. परंतु, काही बाजार समितीत व्यापाऱ्यांनी तोलाईचे पैसे देण्याची तयारी दर्शवूनही कामगारांनी त्यास विरोध केला. या वादामुळे बाजार समित्यांनी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडींचा नाहक फटका उत्पादकांना बसणार आहे. कांदा लिलाव किती दिवस बंद राहणार याबाबत साशंकता आहे. उन्हाळ कांदा खराब होऊ लागल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे. या प्रकरणात लिलाव सुरू राहावेत, अशीच शेतकरी संघटनेची भूमिका असून त्वरीत तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी डॉ. गिरधर पाटील यांनी केली आहे.