घोटीत भरदिवसा घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास Print

इगतपुरी
तालुक्यातील घोटी येथे शुक्रवारी सकाळी एका घरातून एक लाख २० हजार रुपये व जवळपास १२ तोळे दागिने, असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला. मध्यवस्तीतील नवनाथनगर येथे राहणाऱ्या पुंजाबाई भांडमुखे (४०) सकाळी सहाच्या सुमारास भाजीपाला खरेदीसाठी घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या. बाजारातून साडेनऊच्या सुमारास त्या घरी परतल्या असता दरवाजाचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. या चोरीत कपाटात ठेवलेले एक लाख २० हजार रुपये रोख तसेच १२ तोळे दागिने, असा एकूण चार लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटय़ांनी लांबविला. दिवसा झालेल्या या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.