दरोडा टाकून पळणाऱ्या सहा दरोडेखोरांना अटक Print

प्रतिनिधी, अलिबाग
 माणगाव तालुक्यातील साई कोंड गावात दरोडा टाकून पळणाऱ्या सहा जणांना रायगड पोलिसांनी जेरबंद केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुन्हा घडल्यानंतर सहा तासांच्या आत या गुन्ह्य़ातील सहा जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तीन दरोडेखोर पसार झाले. त्यांचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.
साई कोंड येथील लोहारकाम करणाऱ्या आशा राजू साळुंखे यांच्या घरावर ४ ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास दरोडा पडला. या दरोडय़ात आशा साळुंखे, त्यांचे पती राजू साळुंखे आणि एका नोकरावर सशस्त्र हल्ला करण्यात आला, तर आशा साळुंखे यांचे ४३ हजारांचे दागिने चोरून नेले. या घटनेची माहिती अलिबाग येथील पोलीस नियंत्रण कक्षाला कोणी तरी दिली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत माणगाव साई रस्त्यावर नाकाबंदी सुरू केली. नाकाबंदी सुरू असताना रात्री नऊ- सव्वानऊच्या सुमारास एक टाटा सफारी गाडी नाकाबंदीच्या येथे आली. मात्र गाडीची तपासणी सुरू करताच गाडीतील सात जण पळून गेले. मात्र अजय साळुंखे (रा. कात्रज, पुणे) आणि शंकर भौमिक (रा. कात्रज, पुणे) या दोन दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
ताब्यात आलेल्या दरोडेखोरांना हाताशी धरून पोलिसांनी पुन्हा एकदा उर्वरित दरोडेखोरांचा तपास सुरू केला. या तपासासाठी पोलिसांनी दरोडेखोरांच्याच गाडीचा वापर केला. आपलीच गाडी परत आल्याचे समजून दरोडेखोर गाडीजवळ आले. त्यांना पोलिसांनी पकडले. यात नामदेव कृष्णा मुकणे (काजुवाडी, खोपोली), हरिश्चंद्र वाघमारे (चोचीवाडी, कर्जत), दीपक वाघमारे (खांडपेवाडी, खोपोली), दीप बर्मन (हावडा, कोलकाता) या चौघांचा यात समावेश आहे, तर तीन जण अद्यापही फरार आहेत.
 दरोडय़ात वापरण्यात आलेली टाटा सफारी गाडी पोलिसांनी जप्त केली, तर चोरून नेलेल्या ४३ हजार रुपयांच्या दागिन्यांपैकी ३० हजारांचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.