वैदेही चौधरी व अजिंक्य पाथरकर यांना दुहेरी मुकुट Print

स्त्री मंडळ आयोजित बॅडमिंटन स्पर्धा
प्रतिनिधी , नाशिक
वैदेही चौधरी आणि अजिंक्य पाथरकर यांनी येथे स्त्री मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित व बाळासाहेब वैशंपायन ट्रस्टतर्फे पुरस्कृत बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला. बक्षीस वितरण सोहळा नगरसेविका सुजाता डेरे आणि डॉ. सुचेता बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.  या स्पर्धेत विविध वयोगटांमध्ये खुशी घरटे, अमेय खोंड, आर्या मोरे, विपुल शिंदे, अक्षय गायधनी यांनी एकेरीत, तर दुहेरीत श्रीपाद कुलकर्णी व रोहित उफाडे यांनी विजेतेपद मिळविले. वैदेही चौधरीने १५ वर्षांआतील व १७ वर्षांआतील गटात, तर अजिंक्य पाथरकरने १३ वर्षांआतील व १५ वर्षांआतील गटात विजेतेपद मिळविले. या वेळी डेरे यांनी महापालिकेतर्फे लवकरच खेळाडू दत्तक योजना अमलात आणली जाणार असल्याचे सांगितले. बाळासाहेब वैशंपायन ट्रस्टतर्फे स्मिता वैशंपायन यांनी उदयोन्मुख गरजू खेळाडूला ट्रस्टतर्फे प्रतिवर्षी १० हजार रुपये अर्थसाहाय्य करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. प्रस्तावना अलका कुकडे यांनी केली. या वेळी मंडळाच्या अध्यक्षा जयश्री काशीकर, नीला जोशी, अंजली किरपेकर, योगेश एकबोटे, पराग एकाडे, पराग पवार, राजू लोहार हे उपस्थित होते.