छेडछाडविरोधात नाशिकमध्ये ‘रायुकाँ’ ची ‘हेल्पलाईन’ Print

प्रतिनिधी, नाशिक
महापालिकांच्या शाळांमधील अस्वच्छता, परिसरातील रोडरोमिओचा उच्छाद, यासंदर्भात थेट राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे विद्यार्थिनींनी गाऱ्हाणे मांडल्याच्या पाश्र्वभूमीवर महापालिका शाळा क्रमांक २० येथे  शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘रास्ता रोको’आंदोलन करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष छबु नागरे यांनी दिली. महापालिकांच्या शाळेच्या परिसरासह इतर ठिकाणी महिला व विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात सुप्रियाताईंनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे जमा झाल्या. तसेच या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लाईट, पाणी, स्वच्छतागृह अशा मुबलक सुविधाही पुरविण्यात आलेल्या नाही. याबाबत शुक्रवारी छबु नागरे यांच्या नेतृत्वाखाली शाळा क्र. २० येथे आंदोलन करण्यात आले. अंबड पोलिसांच्या मध्यस्थीनंतर  आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील छेडछाडविरोधात रोडरोमिओचा बंदोबस्त करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. गुंडांचा त्रास होणाऱ्या विद्यार्थिनी व महिलांनी ९७६२१००१००, ९७६२२००२०० या क्रमांकांसह पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी (९९२३४९७९००), सहआयुक्त गणेश शिंदे (९९२३४२३२९१), अंबडचे पोलीस निरीक्षक (९४२२७३३६४४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.