‘नासाका’चा गळीत हंगाम सुरु करण्यास जिल्हा बँकेचा अडसर Print

देविदास पिंगळेंचा आरोप
प्रतिनिधी ,नाशिक
नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी मंजूर झालेले कर्ज देण्यास नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप कारखान्याचे अध्यक्ष देविदास पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत केला. या पद्धतीने अडवणूक करत कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न राजकीय विरोधक करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक सहकारी कारखान्याच्या २०१२ ते २०१३ च्या गळीत हंगामासाठी बँकेने पूर्व हंगामी अल्प मुदतीचे सात कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. गळीत हंगाम वेळेत सुरु करण्यासाठी काही दिवस राहिल्याने ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा, यंत्रणा दुरुस्ती, साहित्य खरेदी, कामगारांचे पगार, यांकरिता पैशांची तातडीने निकड आहे. सध्या साखर विक्रीचा भरणा २,६५० रुपये प्रतिक्विंटल आहे. साखर विक्रीतून अतिरिक्त मिळणारी रक्कम यंदाच्या हंगाम पूर्व खर्चासाठी केला जात आहे. कारखान्यास मंजूर झालेल्या रक्कमेची उचल करतांना २६५० रुपये पेक्षा अधिक वापरेली रक्कमेची परतफेड करण्यात येणार आहे.
असे असताना गळीत हंगाम सुरु करण्याकरिता बँक उचल देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे पिंगळे यांनी नमूद केले. हंगाम सुरु करण्यासाठी ऊस तोडणी कामगारांचे करार, कर्मचाऱ्यांचे पगार आदी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असल्याने २,६५० पेक्षा अधिक दराने येणारी रक्कम उपरोक्त खर्चासाठी केली जाणार आहे.
तसेच बँकेच्या नियमाप्रमाणे देय रक्कम खात्यामध्ये व्याजासह भरलेली असताना तसेच पळसे शाखेत ६० लाख रुपये अतिरिक्त असतानाही केवळ राजकीय हेतुने काही विरोधकांकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कारखाना २,६५० रुपये प्रती क्विंटलप्रमाणे भरणा करणार असल्याचे पत्रही बँकेच्या कार्यकारी संचालकांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.