अलिबागमध्ये आजपासून सैन्यभरती Print

अलिबाग,प्रतिनिधी
 मुंबईच्या संचालक सैन्यभरती विभागाकडून अलिबागच्या आरसीएफ मैदानावर आजपासून सैन्यभरतीला सुरुवात होणार आहे. ६ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या भरतीत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि रायगड या पाच जिल्ह्य़ांतील इच्छुक उमेदवार सहभागी होणार आहेत. भरतीसाठी आवश्यक असणारी सर्व तयारी पूर्ण झाली असून या भरतीमुळे जास्तीत जास्त स्थानिकांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार असल्याचे कर्नल हरमित सिंग यांनी सांगितले.
सैन्यदलातील सोल्जर, टेक्निकल, सोल्जर जनरल डय़ुटी, क्लर्क आणि धर्मगुरू या पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. सकाळी पाच वाजल्यापासून भरतीला सुरुवात होणार असून उमेदवारांची राहण्याची व्यवस्था नेऊली येथील जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आली आहे, तर तेथून उमेदवारांना आरसीएफ ग्राऊंडवर आणण्यासाठी गाडीची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच मुलांना भरतीच्या ग्राऊंडमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची बायोमेट्रिक नोंदणी होईल, तर सगळ्यात शेवटी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. भरतीच्या ठिकाणी आलेल्या उमेदवारांची राहण्याची, पाण्याची, जेवणाची आणि प्रातर्विधीची गैरसोय होत असते. यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. भरतीच्या ठिकाणी मोबाइल शौचालये उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
६ ऑक्टोबरला रायगड जिल्ह्य़ातील इच्छुक उमेदवारांची भरती होणार आहे. ७ आणि ८ ऑक्टोबरला नाशिकमधील उमेदवारांची भरती होणार आहे. ९ ऑक्टोबरला एनसीसी, माजी सैनिक व सैनिकांची मुले, खेळाडू आणि धर्मगुरू यांची भरती होणार आहे, तर ११ तारखेला मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ातील इच्छुक उमेदवारांची भरती होणार आहे. भरतीप्रक्रियेत जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कर्नल हरमित स्िंाग यांनी केले आहे.