सप्तश्रृंग गडावर त्वरित सुविधा देण्याचे निर्देश Print

नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर आढावा बैठक
कळवण
नवरात्रोत्सवास अवघे काही दिवस राहिले असताना सप्तश्रृंग गडावर भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा अद्यापही उभारण्यात आल्या नसल्याचे अप्पर जिल्हाधिकारी आर. के. गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली गडावर तालुक्यातील मुख्य अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या आढावा बैठकीत समोर आले. १३ ऑक्टोबपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची ताकीद या वेळी देण्यात आली. १६ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तश्रृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी नऊ दिवस हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. काही वर्षांपासून भाविकांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर भाविकांच्या दृष्टीने प्रशासनातर्फे आवश्यक त्या सुविधा उभारण्यात येतात. यंदा मात्र अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही तयारी पूर्ण झाली नसल्याचे आढावा बैठकीत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावर गावंडे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत पुढील आठ दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच भाविकांना अडचणींचा सामना करावा लागल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
यात्रोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरूपात बस स्थानक उभारणीस अजूनही गती मिळालेली नसल्याने गावंडे यांनी खंत व्यक्त केली. बस स्थानक परिसरात दोन कंट्रोल रुम, शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आवश्यक त्या ठिकाणी मुरुम व खडी टाकणे, तसेच आरोग्य, बांधकाम विभाग, वीज वितरण, ट्रस्ट आणि ग्रामपंचायत प्रमुखांना सर्व ती कामे करण्याच्या सूचना या वेळी गावंडे यांनी दिल्या. २० ठिकाणी डिजिटल सूचना फलक, तीन ठिकाणी पादत्राणांची व्यवस्था, ५०० पोलीस कर्मचारी, नांदूर ते गड या दरम्यान २०० बस, खासगी वाहनांना प्रतिबंध, प्लास्टिक बंदी, अन्न तपासणी, व्हीआयपी पास बंद, सीसीटीव्ही यंत्रणा, पाच ठिकाणी दवाखाने, दहा वैद्यकीय अधिकारी, ५० कर्मचारी, आपत्कालीन कक्ष, तीन रुग्णवाहिका, तीन फिरते दवाखाने, यांसह इतरही सुविधा उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजितकुमार झा, वन विभागाचे के. प्रदीपा, प्रांताधिकारी भीमराव शिंदे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, ट्रस्टचे विश्वस्त दिलीप वनारसे आदींसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.