लिलाव बंद ठेवणाऱ्या बाजार समित्या बरखास्तीचे निर्देश Print

प्रतिनिधी, नाशिक
व्यापारी-माथाडी कामगार यांच्या वादामुळे शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा व धान्यमालाचे व्यवहार बंद ठेवण्याचा प्रयत्न कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यवहार बंद ठेवणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रत्यक्षात येऊ शकला नाही. शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील ज्या बाजार समित्यांनी हे लिलाव बंद ठेवले, त्यांनीदेखील सायंकाळी कांद्याचे लिलाव सुरू करत कारवाईच्या कचाटय़ातून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. उर्वरित बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद नसल्याची माहिती सहकार विभागाने दिली असली तरी माथाडी कामगार व व्यापाऱ्यांकडून त्यास प्रतिसाद मिळाला नसल्याचे पाहावयास मिळाले.
कांदा लिलाव प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक काटय़ावर केलेल्या वजनाच्या पावतीचा क्रमांक टाकण्यावरून व्यापारी व माथाडी कामगार संघटना यांच्यात निर्माण झालेल्या वादंगात प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील व्यवहार शुक्रवारपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, येवला, सिन्नर आणि देवळा बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी सकाळपासून कांदा व धान्यमालाचे लिलाव बंद होते. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन कृषीमंत्र्यांनी कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर ज्या बाजार समित्यांमध्ये सकाळी लिलाव झाले नाही, त्यांनी ते सायंकाळी सुरू करण्याचा प्रयत्न केला. तथापि, व्यापारी व माथाडी कामगारांच्या लिलाव होणार नसल्याच्या भूमिकेमुळे उत्पादकांनीही या दिवशी बाजारात कांदा विक्रीसाठी आणला नव्हता. परिणामी, कांद्याचे फारसे लिलावही झाले नाही. माथाडी कामगार-व्यापारी यांच्या वादावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे निर्देश पणनमंत्री विखे-पाटील यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी संबंधितांच्या बैठकाही घेतल्या. असे असताना संबंधितांनी बाजार समित्या बंद ठेवण्याचा इशारा दिल्यामुळे कृषीमंत्र्यांनी संबंधितांवर बरखास्तीची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी सर्व बाजार समित्यांना त्यानुसार नोटीस बजावली होती. बाजार समितीवर बरखास्तीची कारवाई होऊ शकते याची जाणीव झाल्यामुळे ज्या बाजार समित्यांनी सकाळी कांदा लिलाव बंद ठेवले, त्यांनीदेखील सायंकाळी हे काम सुरू केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक बाजीराव शिंदे यांनी दिली. बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू आहेत की नाही याची खातरजमा करण्यासाठी व्हिडीओ चित्रणही करण्यात आले. कारवाईच्या भीतीमुळे बाजार समित्यांनी आपले व्यवहार सुरू ठेवले असले तरी व्यापारी व माथाडी कामगारांनी त्यास कितपत प्रतिसाद दिला हा देखील एक प्रश्न आहे.