रत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाचा धुमाकूळ; भातपिकाचे नुकसान Print

खास प्रतिनिधी, रत्नागिरी  
यंदाच्या मान्सून पावसाचा अखेरचा टप्पा रत्नागिरी जिल्ह्य़ात चांगलाच त्रासदायक ठरत असून गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी सुमारे तीन इंच पावसाची नोंद झाली आहे. विशेषत: विजांच्या चमचमाटासह आज पहाटे झालेल्या वादळी पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.  गेल्या महिन्याच्या उत्तरार्धात गायब झालेला पाऊस या महिन्याच्या सुरुवातीपासून सर्वत्र पुन्हा बरसू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. गेले दोन दिवस काही प्रमाणात उघडीप होती, पण काल संध्याकाळनंतर रत्नागिरीसह जिल्ह्य़ाच्या अनेक भागांमध्ये पुन्हा ढग दाटून आले आणि रात्री उशिरा पावसाचा धुमाकूळ सुरू झाला. लांजा, रत्नागिरी आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांमध्ये त्याचा विशेष जोर होता. त्याचप्रमाणे पहाटे २ ते ४.३० या वेळात मोठय़ा प्रमाणात विजा पडल्या. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे दोन बैल मृत्युमुखी पडले, तसेच काही गावकऱ्यांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या. आज सकाळपर्यंत संगमेश्वर तालुक्यात २२३ मिलिमीटर, लांजा १३१ मिलिमीटर आणि रत्नागिरी तालुक्यात १२८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामानाने दापोली (८३.२ मिमी), खेड (४७ मिमी) आणि चिपळूण (३८ मिमी) या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहिला.  विजांच्या कडकडाटामुळे जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी वीजप्रवाह खंडित होण्याचे प्रकार घडले. तसेच काही ठिकाणी विजेचे खांब आणि तारांचेही नुकसान झाले आहे. तेथे दुरुस्ती करून वीजप्रवाह पूर्ववत सुरू करण्यासाठी आज सकाळपासून कर्मचारी कामाला लागले आहेत.  सध्याच्या जिल्ह्य़ात बहुतेक ठिकाणी भातपीक तयार झाले असून शेतकरी कापणीच्या दृष्टीने नियोजन करू लागले आहेत, पण त्यापूर्वीच कोसळू लागलेल्या या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातील उभे पीक जमिनीवर लोळू लागले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सध्या हस्त नक्षत्र सुरू असून येत्या बुधवापर्यंत त्याचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते.