प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी रोहे-हरेश्वर एसटी सेवा बंद Print

रोहे,
रोहे एसटी आगारातर्फे सागरी महामार्गअंतर्गत मांदाड खाडीपूल मार्गाने जाणारी रोहे, विरजोली, मांदाड, पाबरे, म्हसळा, श्रीवर्धनमार्गे हरिहरेश्वर ही बससेवा प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे अखेर बंद करण्याचा निर्णय आगार व्यवस्थापक यांनी घेतला आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वरसाठी मांदाड पूलमार्गे बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून सतत आमदार अनिल तटकरे यांच्याकडे करण्यात आली होती. तटकरे यांच्या विनंतीनुसार रोहे आगारातर्फे सदर बससेवा सुरू करण्यात आली होती. यापूर्वी रोहे-हरिहरेश्वर बससेवा कोलाड, माणगाव, मोर्बा साईमार्गे सुरू होती. या मार्गावरून रोहे, श्रीवर्धन बससेवा सुरू केल्यास या सेवेला प्रवाशांचा निश्चित प्रतिसाद मिळेल, अशी मागणी आता पुढे आली आहे. परंतु चालक उपलब्ध नसल्यामुळे एसटी प्रशासन नवीन मार्गावर बससेवा सुरू करण्याच्या मन:स्थितीमध्ये नसल्याचे सांगण्यात येते. रोहे एसटी आगारामध्ये सध्या ३६ चालकांची गरज असल्याचे सांगण्यात येते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर चालकांची संख्या कमी असल्याने बससेवेचे वेळापत्रक कोलमडून पडत आहे व अधिकारी वर्ग नाहक प्रवाशांच्या रोषाला बळी पडत आहे.