विलासराव समर्थक चिखलीकर ‘राष्ट्रवादी’त! Print

वार्ताहर

नांदेड
काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक-माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याचे निश्चित करून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना नवा राजकीय ‘ताप’ देण्याचे पाऊल टाकले.
नांदेड शहरात मनपा निवडणुकीच्या निमित्ताने अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येत्या रविवारी या निवडणुकीसाठी मतदान होत असताना, ‘राष्ट्रवादी’च्या थोरल्या व धाकटय़ा पवारांनी चव्हाण यांना विरोध करण्यासाठी अत्यंत सक्षम असलेल्या चिखलीकरांना राष्ट्रवादीत खेचले आहे.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना अपक्ष आमदार असलेल्या चिखलीकरांनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला. विलासराव हयात असेपर्यंत ते त्यांच्याशी एकनिष्ठ होते. देशमुखांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर चिखलीकरांचा राजकीय कल आधी अशोक चव्हाण यांच्या बाजूने झुकला होता; पण काँग्रेस पक्षातून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. काही आठवडे चर्चा, विचारविनिमय केल्यानंतर त्यांच्या ‘राष्ट्रवादी’तील प्रवेशाचे नक्की झाले. याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी होईल.‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार रविवारी पुण्यात होते. चिखलीकर व त्यांच्या समर्थकांना त्यांची भेट घेऊन सर्व बाबींवर चर्चा केली. पक्षात सन्मानच होईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर चिखलीकरांनी पक्षात येण्याचे मान्य केले. ते मनपा निवडणुकीसाठी ‘राष्ट्रवादी’च्या प्रचारात उद्यापासून उतरणार आहेत; पण त्यांचा पक्ष प्रवेशाचा भव्य सोहळा त्यांच्या लोहा-कंधार मतदारसंघात नंतर स्वतंत्रपणे होणार आहे, असे चिखलीकर मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश राठोड यांनी सांगितले.नांदेड-वाघाळा मनपा निवडणुकीच्या निमित्ताने ‘राष्ट्रवादी’चे स्थानिक नेते एकत्र आले आहेत. त्यांच्या या ऐक्याचे वर्णन ‘समझोता एक्स्प्रेस’ अशा शब्दांत केले गेले. या एक्स्प्रेसला चिखलीकरांनी आपला ‘जम्बो कोच’ जोडण्याचे नक्की केल्याने काँग्रेसला तो धक्का मानला जात आहे.