उंडरगावला शॉर्टसर्किटमुळे घराला आग Print

मुरुडखार- अंबोली ग्रामपंचायत हद्दीमधील उंडरगाव येथील जनार्दन बारक्या भोईर यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सदरील घर लाकडी असल्याने पेट लवकर घेतल्याने मदत मिळण्याअगोदर घराचे अतोनात नुकसान झाले आहे. सदरील घटना दुपारच्या तीनच्या सुमारास घडली. या आगीत टीव्ही, शोकेस, कपडे आदी मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले.
सदरची घटना कळताच तहसील कार्यालय मुरुड यांनी तातडीने दखल घेत पंचनामा केला आहे. या वेळी पंचायत समिती सदस्य अनंता ठाकूर यांनी भेट देऊन शासनाकडून जादा आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी उपाध्यक्ष मंगेश दांडेकर व पाणीपुरवठा सभापती बाबा दांडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.