खोपोलीत महाआरोग्य शिबिरांचे आज आयोजन Print

खोपोली, ८ ऑक्टोबर :
कर्जत विधानसभेचे विद्यमान आ. सुरेशभाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे व न. पा. शिक्षण मंडळाचे सभापती िवद्यमान नगरसेवक मंगेश दळवी यांच्या संयोजनाखाली व माधवबाग यांच्या सहकार्याने मंगळवारी (९ ऑक्टो.) सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत, खोपोलीतील लोहाणा महाजनवाडी हॉलमध्ये ‘महाआरोग्य शिबिरांचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये गरजू नागरिकांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये हृदयरोग, सांध्यांचे आजार, बी.एम.डी., रक्तदाब, ई.सी.जी. व व्ही.पी.टी. इत्यादीचा समावेश आहे. सानेकेअर संचालित माधवबाग तथा आयुर्वेदिक कार्डियाक हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुदत्त अमिन यांचे सकाळी १०.१५ वाजता हृदयरोगांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
खोपोली शहर तसेच कर्जत व खालापूर तालुक्यातील गरजू नागरिकांनी महाआरोग्य शिबिरांचा तसेच व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी केले आहे.