काँग्रेस शहराध्यक्षांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न Print

प्रतिनिधी / नाशिक
काँग्रेस शहराध्यक्षांच्या वाहनाच्या झालेल्या तोडफोडीचा विरोधी गटाशी संबंध जोडत आकाश छाजेड यांनी केलेले आरोप हे केवळ सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी असून उलट आ. जयप्रकाश छाजेड व आकाश छाजेड हेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भ्रमणध्वनीवरून धमकावीत असतात, असा आरोप करत वाहनाच्या तोडफोडीची चौकशी करून समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी छाजेडविरोधी गटाने पोलिसांकडे केली आहे. शनिवारी मध्यरात्री काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या डिझायर कारची तोडफोड झाली. यामागे पक्षांतील राजकारण कारणीभूत असल्याची साशंकता छाजेड यांनी व्यक्त केली होती. ‘छाजेड हटाओ, काँग्रेस बचाओ’ ही विरोधकांची मोहीम सुरू असताना हा प्रकार घडल्याने वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. छाजेड यांनीही संशयितांचा छडा लावण्याची मागणी केली होती. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, सोमवारी माजी मंत्री शोभा बच्छाव, नगरसेवक दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे आदींच्या नेतृत्वाखाली विरोधी गटाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत या प्रकरणाची चौकशी करावीच, अशी मागणी करतानाच छाजेडांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. वास्तविक काँग्रेस पदाधिकारी वा कार्यकर्ते असा कोणताही गैरप्रकार करू शकत नाहीत. यापूर्वी पक्षांतर्गत मतभेद झाले असताना अशा प्रकारचे आरोप कोणी केलेले नाहीत. त्यामुळे आकाश छाजेड यांनी केलेले आरोप हे केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी आहेत. शहर काँग्रेसमध्ये वाद नसताना आ. छाजेड यांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. ४० वर्षांच्या राजकारणात त्यांना अनेक हितशत्रू निर्माण झाले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. पक्षाच्या अंतर्गत वादात शहराध्यक्ष वारंवार पोलिसांकडे धाव घेतात आणि पदाधिकाऱ्यांवर आरोप करतात. आ. छाजेड व आकाश छाजेड हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना फोनवरून दमबाजी करतात व धमकावून मानसिक छळ करतात. या पाश्र्वभूमीवर, पोलिसांनी आ. छाजेड यांच्यासह शहराध्यक्षांच्या वाहनाची झालेली तोडफोड याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.