बालभारतीच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन Print

प्रतिनिधी , पुणे
बालभारतीच्या कार्यालयीन सचिव निलिमा नाईक यांच्या विरुद्ध बालभारतीतील राष्ट्रवादी पाठय़पुस्तक मंडळ कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले. नाईक यांची ताबडतोब बदली करावी अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
बालभारतीमधील अनेक कमचाऱ्यांना पदोन्नती मिळणे अपेक्षित होते. त्याचप्रमाणे ३ ते ५ वर्षे जे कर्मचारी एकाच ठिकाणी काम करत आहेत अशा कर्मचाऱ्यांची बदली होणे अपेक्षित होते. मात्र, पदे रिक्त असतानाही कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन पदे भरली जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी नाईक यांच्यावर केला आहे. नाईक यांचा निषेध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. बालभारतीचे संचालक सर्जेराव जाधव यांच्याशीही कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. कर्मचाऱ्यांशी मंगळवारी पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.