नऊ अनुदानित सिलिंडर देण्यावर काँग्रेस ठाम - ठाकरे Print

प्रतिनिधी , पुणे
वर्षांत सहा अनुदानित सिलिंडर देण्याचा निर्णय केंद्राने घेतला असला, तरी अनुदानित नऊ सििलडर देण्यावर काँग्रेस ठाम आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी केले.पुणे शहर काँग्रेसतर्फे महात्मा गांधी जयंतीपासून आयोजित करण्यात आलेल्या गांधी सप्ताहाचा समारोप सोमवारी ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रत्येक कुटुंबाला वर्षांला अनुदानित सहा सिलिंडर देण्याचा निर्णय झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यांनी अतिरिक्त तीन सििलडरचा खर्च सोसून नऊ सििलडर द्यावेत, अशी भूमिका घेतली आहे. तसे आदेशही दिले आहेत. तरीही निर्णय घेण्यासाठी वेळ का लागत आहे, अशी विचारणा केल्यानंतर ठाकरे म्हणाले, की मी स्वत: या संबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांनाही ही भूमिका सांगितली आहे. वर्षांला नऊ अनुदानित सिलिंडर देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही त्यावर ठाम आहोत. या निर्णयाबाबत मित्र पक्षाकडून काही अडथळा होत आहे का, असे विचारल्यानंतर ते म्हणाले, की जनसामान्यांना दिलासा देण्याच्या विषयाबाबत आघाडीतील मित्र पक्षाचे काही वेगळे विचार असतील असे दिसत नाही.     
भाजपचा पाठिंबा काढावा
श्वेतपत्रिकेबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे आणि राष्ट्रवादीनेही त्याला प्रतिसाद दिला आहे. त्याबाबत संयुक्तपणे निर्णय होईल. मात्र, या विषयात भाजप ज्या पद्धतीने राष्ट्रवादीवर आरोप करत आहे, मोहीम चालवत आहे, ती पाहता भाजपला राज्यात राष्ट्रवादीने जेथे जेथे पाठिंबा दिला आहे, तो राष्ट्रवादीने काढून घेतला पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले. आमच्याकडे अनेक सक्षम मंत्री असल्याचे सांगत पुणे जिल्ह्य़ाच्या पालकमंत्रिपदावरही त्यांनी दावा केला.
केजरीवालांचे असत्य विचार
गांधीजींच्या गुजरातमध्ये सध्या मोदींचे विचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गांधींजींचे विचार बळकट करण्याची गरज आहे. तसे झाले, तरच मजबूत भारत उभा राहील, असे मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ठाकरे म्हणाले. पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मानचित्रे वापरून केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांना उपोषणाला बसवले आणि आता त्यांना गांधींची आठवण झाली आहे. प्रत्यक्षात मात्र गांधींची टोपी घालून ते आता असत्य विचार पसरवत आहेत, अशीही टीका ठाकरे यांनी केली.
‘कार्यकर्त्यांचा मानस स्वबळाचा’
राज्यभरात दौरे आणि बैठका सुरू असून २०१४ साली होणाऱ्या निवडणुकांची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. त्यासाठीचे कार्यक्रमही जिल्हा समित्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात १७ ऑक्टोबरपासून सदस्य नोंदणी सुरू होत असून अनेक जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांचे मानस निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असेच आहे. वेगळे लढावे की एकत्र लढावे याबाबत कार्यकर्ते, पदाधिकारी, ब्लॉक तसेच जिल्हा समित्यांचे जे मत असेल ते पक्षश्रेष्ठींना कळवले जाईल आणि त्यांच्याकडूनच त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशीही माहिती माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.