बेळगावमध्ये ११ ऑक्टोबरला एकीकरण समितीचा निषेध मोर्चा Print

विधानसौधच्या उद्घाटनाला विरोध
प्रतिनिधी , कोल्हापूर
बेळगावसह सीमाप्रश्नाचा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना कर्नाटक शासनाने विधानसौधचे उद्घाटन ११ ऑक्टोबरला करण्याचे ठरवले आहे. या अन्यायकारक भूमिकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने या दिवशी बेळगावमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींनी येऊ नये, याकरिता महाराष्ट्रातील खासदार व आमदारांना घेराव घालून निवेदन देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पत्रकार परिषदेस महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव शहराध्यक्ष तुकाराम केशव पाटील, तालुकाध्यक्ष पी. आय. पाटील, तालुका सचिव मनोज पारसे, बेळगाव शहर सचिव ऊरुणकर, टी. के. चौगुले, बाळासाहेब जाऊळकर, कृष्णा डोंगळे, रवि नाईक, मनोहर टिकेकर, अरुण पाटील आदी उपस्थित होते. तुकाराम पाटील म्हणाले, कर्नाटक शासनाने सीमाभागातील मराठी भाषकांवर गेली अनेक वर्षे दडपशाही चालवली आहे. मराठी बांधवांची सर्व बाजूंनी गोची करण्याचा त्यांचा कुटिल डाव आहे. तरीही सीमाभागातील मराठी भाषकांनी आपला महाराष्ट्रात समावेश व्हावा, यासाठी लढा चालू ठेवला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील भाषिक वादाचा दावा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्याच्या निकाल जाहीर होण्याअगोदरच कर्नाटक शासनाने बेळगावमध्ये विधानसौधची उभारणी केली आहे. कर्नाटक शासनाचीही भूमिका अन्यायकारक असून या उद्घाटन सोहळय़ाविरुद्ध मराठी जनमत संघटित होत आहे. विधानसौधसाठी कर्नाटक शासनाने मिळवलेली जागा बेकायदेशीर आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी या कामाकरिता लाटल्या गेल्या आहेत. कर्नाटक शासनाच्या अन्यायाचा आणखी एक पाढा आहे. अन्यायाच्या मळावर उभारलेल्या या वास्तूच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कर्नाटक शासनाने निमंत्रण दिले आहे. या प्रकारामुळे मराठी भाषकांवरील अन्यायात आणखी भर पडणार आहे. त्याकरिता महाराष्ट्रातील सर्व खासदार व आमदारांनी ताकदीने उभे राहण्याची गरज आहे. त्यांनी या कार्यक्रमाकरिता राष्ट्रपतींनी येऊ नये यासाठी आपली ताकद पणाला लावली पाहिजे. यासाठीच महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्रातील सर्व खासदार व आमदार यांना घेराव घालून या मागणीचे निवेदन दिले जाणार आहे. याची सुरुवात कोल्हापुरातून करण्यात आलेली आहे.  कोल्हापूरचे ज्येष्ठ खासदार सदाशिवराव मंडलिक, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना सोमवारी घेराव घालून महाराष्ट्र एकीकरण समितीने निवेदन सादर केले आहे, असे तुकाराम पाटील यांनी या वेळी सांगितले.