मुख्यमंत्र्यांचा बोलविता धनी वेगळाच- पाटील Print

वार्ताहर , लातूर
मुख्यमंत्र्यांच्या मागून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात कोणीतरी दुसराच मोहीम राबवतो आहे. केवळ मुख्यमंत्री समोर आहेत, असा आरोप युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. डी. एन. शेळके, मुर्तूजा खान, मकरंद सावे, अविनाश रेशमे, बबन भोसले, शंकर गुट्टे या वेळी उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीला भरघोस यश मिळते आहे. राष्ट्रवादी राज्यातील सर्वात मोठा पक्ष होत असल्यामुळे पोटशूळ उठून जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला. राष्ट्रवादीची राज्यात घोडदौड सुरू आहे. येत्या १५ ऑक्टोबरला लातूर येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत युवती मेळावा, तर २८ ऑक्टोबरला औरंगाबादेत राज्यस्तरीय युवती मेळावा घेतला जाणार आहे. दि. २० व २१ ऑक्टोबरला पुणे येथे युवकांचा मेळावा असून, मेळाव्यास अजित पवार व सुप्रिया सुळे हे दोघेही मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांत युवकांसाठी १० टक्के जागा मागितल्या जाणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के जागांची मागणी केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के जागांची मागणी केली जाणार आहे. लातूर शहरात गेल्या आठवडाभरापासून भयग्रस्त वातावरण आहे. नागरिकांवरील होत असलेल्या हल्ल्याच्या तपासात पोलिसांची प्रगती नाही. पोलिसांनी काही केले नाही तर त्यांच्या विरोधात युवक राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही पाटील यांनी दिला.