द्रुतगती मार्गावर टेम्पो-कारच्या अपघातात तीन ठार Print

प्रतिनिधी , पुणे
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सडवली गावाजवळ सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास टेम्पो व कारमध्ये झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. मृतांमध्ये कोथरूड पोलीस ठाण्यातील एका हवालदाराचा समावेश आहे.
अमोल प्रमोद कळांबे (वय ३६), अतुल प्रमोद कळांबे (वय २०, रा. दोघेही-किरकिटवाडी, खडकवासला) आणि बाळासाहेब डेव्हिड त्रिभुवन (वय ३७, रा. खडकवासला) अशी मृतांची  नावे आहेत. जयवंत घाडगे (वय ३८, रा. कराड), अब्दुल हमजा (वय २७, रा. मुंबई)आणि अकबरअली मयमुल्ला खान (वय ३४, रा. उत्तर प्रदेश) हे या अपघातात जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान हा टेम्पो घेऊन मुंबईहून पुण्याकडे जात असताना त्याचा टेम्पोवरील ताबा सुटल्यामुळे तो दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला गेला. समोरून येणाऱ्या इंडिगो कारला जाऊन धडकला.
या अपघातात इंडिगो गाडीमधील कळांबे बंधूंसह तिघांचा मृत्यू झाला, तर दोन्ही मोटारींचे चालक व आणखी एक जण जखमी झाले. त्यांच्यावर निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. अमोल कळांबे हे कोथरूड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. कामानिमित्ताने ते इंडिगो कारमधून जात असताना हा अपघात झाला. मात्र, ते कशासाठी जात होते याची माहिती मिळू शकली नाही.