उद्योजकांचा गुरुवारी बंद Print

वीज दरवाढीच्या निषेधार्थ काढणार मोर्चा
प्रतिनिधी , कोल्हापूर
alt

राज्य सरकारने वीज दरवाढीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करावा म्हणून वीज दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व उद्योजक, सूत गिरण्या ११ ऑक्टोबरला एक दिवसाचा बंद ठेवणार असून त्या दिवशी सर्व जण एकत्र जमून जिल्हाधिकारी व महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील फौंड्री उद्योग, सूत गिरण्या व तत्सम उच्चदाब उद्योग व त्याचबरोबर २७ अश्वशक्तीहून अधिक जोडभार असलेले लघुउद्योग यांचे भवितव्य देशातील स्पर्धात्मक दर व शेजारील राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातील प्रचंड वाढलेले वीजदर यामुळे अत्यंत अडचणीत आले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेने कर्नाटकातील वीजदर अंदाजे २ रु. प्रतियुनिट व गुजरातमधील वीजदर अंदाजे २.५० रु. प्रतियुनिटने कमी आहेत. याचा फटका सर्व उद्योगांना व सूत गिरण्यांना बसत आहे. वीज दरवाढीमुळे राज्याचा औद्योगिक व आर्थिक विकास ठप्प होऊ लागला आहे, याचे भान राज्य सरकारने ठेवणे आवश्यक आहे. दरवाढ हा उपाय नाही, तर कार्यक्षम कारभार, योग्य नियोजन, भ्रष्टाचार, गळती व चोरीवर नियंत्रण, स्पर्धात्मक वीजखरेदी या सर्व मार्गाचा वापर करून वीजदर नियंत्रित ठेवणे किंबहुना खाली आणणे हाच विकासाच्या दृष्टीने एकमेव व शाश्वत पर्याय असून राज्य सरकारने यावर विचार करावा, असेही होगाडे म्हणाले.
गुजरात सरकारने नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले असून या धोरणामध्ये सूत गिरण्यांना वीजदरामध्ये प्रतियुनिट १ रु पया सवलत आहे. कर्नाटक सरकारने १ रु. प्रतियुनिट सवलत यापूर्वीच दिलेली आहे. गुजरातची वीज महाराष्ट्राच्या तुलनेने प्रतियुनिट ३.५० रु. व कर्नाटकची वीज ३ रु. प्रतियुनिट स्वस्त पडणार आहे, याचा विचार करून देशातील ५० टक्के यंत्रमाग असलेल्या महाराष्ट्र सरकारने सूत गिरण्यांना वीजदरात रास्त सवलत द्यावी, अशी मागणीही या वेळी केली आहे.
 या पत्रकार परिषदेला आयआयएफचे अध्यक्ष संजय कारखानीस, केईएचे देवेंद्र ओबेरॉय, ज्येष्ठ उद्योजक राम मेनन, स्मॅकचे अध्यक्ष दिलीप लडगे, स्लिमाचे संजय पाटील, गोशिमा अध्यक्ष अजित आजरी, अशोक दुधाणे, डी. डी. पाटील, सुरजितसिंग पोवार, श्रीकांत दुधाणे, रवींद्र तेंडुलकर, प्रदीप व्हरांबळे आदी उपस्थित होते.