कळवण तालुक्यात वीज पडून मायलेकी ठार Print

प्रतिनिधी, नाशिक
कळवण तालुक्यातील दळवट शिवारात मंगळवारी दुपारी वीज कोसळून झाडाखाली उभ्या असलेल्या मायलेकी ठार झाल्या. सकाळपासून असह्य़ उकाडय़ाने सर्वजण हैराण झाले असताना दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झाली. नाशिक शहर व परिसरात केवळ दहा मिनिटे पावसाने हजेरी लावली. कळवण तालुक्यात पाऊस कमी परंतु विजांचा कडकडाट अधिक अशी स्थिती होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास दळवटजवळील शिंगाशी येथे शेतातून घरी परत येणाऱ्या वाडीबाई लक्ष्मण मोरे (६४) व सखुबाई लक्ष्मण मोरे (१७) या मायलेकी पावसामुळे एका झाडाखाली थांबल्या. वीज कोसळल्याने या दोघींसह एक शेळीही जागीच ठार झाली. या प्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.