‘आजच्या जगण्याचे वास्तव कवितेतून मांडले!’ Print

वार्ताहर, सावंतवाडी
माणसाच्या जीवनमरणाच्या समस्या नव्या पिढीतील कवी दीर्घ कवितांतून मांडत आहेत. जनतेच्या कल्याणाची भावना विध्वंसक करणारी विलक्षण अपप्रवृत्ती सत्तेच्या जोरावर बळावत आहे. या भावनांना कवी अजय कांडर यांनी  ‘हत्ती इलो’ या काव्यसंग्रहातून वाट करून दिली असल्याचे मत अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले. कवी अजय कांडर यांच्या ‘हत्ती रूपी’ कविता संग्रहाने आजच्या सत्ताकारणाचा दहशतवादी चेहरा हत्तीच्या रूपकात कवितेत मांडला आहे, असे प्रा. वसंत डहाके म्हणाले. राजकीय अपप्रवृत्ती समाजवाद, साम्यवाद, हिंदुत्ववाद मागे पाडत आता नवीन विचारसरणी आणत असल्याने आर्थिक अवस्था बदलत असल्याने राजकारणही बदलत चालले आहे. त्यामुळेच सत्ता सामाजिक हितासाठी नव्हे तर सत्ता, संपत्तीसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत राबवीत आहेत, असे प्रा. डहाके म्हणाले. कवी अजय कांडर यांनी आजचे जगण्याचे वास्तव कवितेतून मांडायला हत्ती हे रूपक देऊन हत्तीच्या दहशतीचे चित्र समाजकारणात उमटत असल्याचे मांडले आहे. आजच्या नव्या पिढीचा मेंदू ताब्यात घेण्यासाठी राज्यकर्ते भूमिका राबवीत आहेत. म्हणजेच ब्रिटिशांसारखी भूमी नको तर त्यांना मेंदूचा ताबा हवा आहे, असे प्रा. डहाके म्हणाले. ब्रिटिश, कोरियन, चायनीज कंपन्यांनी जगात मेंदू ताब्यात घेण्याचे राज्य केले आहे, असे ते म्हणाले. जनतेचे शोषण करत हत्ती सुसाट जात असल्याने माणसाचा सहवास हरवला आहे. माणूस सत्तावादाकडे झुकत आहे. राजसत्ता अनुयायांसाठी निर्माण करून त्यातून झुंडशाही निर्माण करण्यात येत असल्याचे प्रा. डहाके म्हणाले. कवी अजय कांडर यांच्या हत्ती इलो काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रा. डहाके यांच्या हस्ते झाले, त्या वेळी प्रा. गोविंद काजरेकर व प्रा. रणधीर शिंदे यांनी कवितासंग्रहावर भाष्य केले. स्वत: कवी कांडर यांनी कवितासंग्रहाविषयी भावना प्रकट केल्यानंतर प्रा. प्रवीण बांदेकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी डॉ. जी. एल. बुवा, तुकाराम नाईक, डॉ. राजन गवस, हरिहर आठलेकर, प्रा. गोपाळ दुखंडे, शरयू आसोलकर, अभय खडपकरसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुमेधा नाईक यांनी केले.