काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन Print

वार्ताहर, सावंतवाडी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त महाराष्ट्रभर विविध विभागीय केंद्राच्या माध्यमातून काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय पातळीवर निवड झालेल्या कवींची राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा नाशिक येथील विद्यापीठाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. गोवा विभागीय केंद्राच्या वतीने विभागीय पातळीवरच काव्यवाचन स्पर्धा सोमवार, १५ ऑक्टोबर रोजी श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. ३०००/-, द्वितीय पारितोषिक रु. २०००/-, तृतीय पारितोषिक रु. १०००/- आणि उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी रु. ५००/- प्रमाणे देण्यात येणार आहेत. या पारितोषिक प्राप्त कवींना राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेसाठी नाशिक येथील मुख्यालयात पाठविण्यात येणार आहे. या काव्यवाचन स्पर्धेसाठी मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या कवी विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. त्याचबरोबर अन्य कवींनाही सहभागी होता येईल. ही काव्यवाचन स्पर्धा सर्वासाठी खुली असणार आहे. स्पर्धेसाठी स्वरचित कविता पाठविणे बंधनकारक आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कवींना आपली स्वरचित कविता  मा. विभागीय संचालक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र गोवा, श्री पंचम खेमराज महाविद्यालय, ग्रंथालय इमारत, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग-४१६५१० या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. विभागीय केंद्राकडे प्राप्त झालेल्या कवितांमधून निवडक व दर्जेदार कवितांच्या कवींशी संपर्क साधून १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या काव्यवाचन स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे कवींनी आपला पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक कवितेसोबत पाठविणे आवश्यक आहे. या काव्यवाचन स्पर्धेत कोकण विभागातून कवींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन गोवा विभागीय संचालक प्रा. दादासाहेब मोरे यांनी केले आहे.