खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत युवतींचा मेळावा - आ. सामंत Print

प्रतिनिधी, रत्नागिरी
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्य़ातील युवतींचा मेळावा शुक्रवारी         (१९ ऑक्टोबर) येथील वि. दा. सावरकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आला असून या जंगी मेळाव्याला सुमारे पाच हजार युवती उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मेळाव्यात सहभागी होणाऱ्या युवतींपैकी एक हजार युवतींना औरंगाबाद येथील राज्यस्तरीय मेळाव्यात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पक्षाची सनद दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खा. सुप्रिया सुळे या १८ ऑक्टोबरला रात्री रत्नागिरीत येणार असून त्यांच्या स्वागतासाठी १०० मुलींचे झांजपथक असणार आहे. १९ रोजी सकाळी त्या शहरातील पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळक स्मारक, महिला पतपेढी, टिळक महिला बचत गट, मच्छीमार महिला यांच्याशी वार्तालाप करणार आहेत; तर सकाळी १० ते ११ या वेळेत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर ११ ते २ वा. सावरकर नाटय़गृहात आयोजित युवती मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील आघाडी शासन लवकरच युवा धोरण जाहीर करणार असून महिलांसाठी शौचालय, तसेच रॅिगगमुक्त महाविद्यालये या संदर्भातील अध्यादेशही निघणार आहेत. दिवाळीनंतर खास युवतींसाठी विविध कार्यक्रम हाती घेतले जाणार असून त्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरीत होणारा युवती मेळावा हा १८ ते ३० वर्षे वयोगटातील युवतींसाठी असून ३० वर्षांवरील महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्याला जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री भास्कर जाधव व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या महिन्यात होणाऱ्या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचे निश्चित केले असून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश सावंत व गजानन पाटील आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना मयेकर यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होत असल्यामुळे आता कोणताही दावा न करता, प्रत्यक्ष आघाडीचे सरपंच बसवूनच ग्रामपंचायतींची संख्या जाहीर करणार असल्याचे आ. सामंत यांनी स्पष्ट केले.