स्वतंत्र विदर्भ आंदोलनात प्राण फुंकण्याच्या हालचाली Print

खास प्रतिनिधी, नागपूर
स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीला मिळत असलेल्या जनतेच्या पाठिंब्यापुढे झुकून काँग्रेसने लवचिक भूमिका घेतल्याने स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत प्राण फुंकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी विदर्भातील जनप्रतिनिधींवर दबाव आणण्याच्या हालचालींना वेग मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाचे नेतृत्त्व विदर्भाबाहेरील नेते करणार आहेत.
आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापलेल्या विदर्भ राज्य संग्राम समितीचेही काम थंडावले असल्याने आंदोलनाची सूत्रे विदर्भाबाहेरील नेत्यांनी ‘हायजॅक’ केल्याचा एक मतप्रवाह आहे. यावर कट्टर विदर्भवादी कोणती भूमिका घेतात, याचीही उत्सुकता आहे. बनवारीलाल पुरोहित, खासदार विलास मुत्तेमवार, रणजित देशमुख, नानाभाऊ एंबडवार, रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांना बाजूला सारून बाहेरील नेते नागपुरात आंदोलन करणार आहेत. उद्या, बुधवारी नागपुरातील रिझर्व बँक चौकात नवे राज्य महासंघाच्या वतीने धरणे दिले जाणार आहे. नवे राज्य महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ठाकूर किशोर सिंह बैस आणि महासंघाच्या विदर्भ शाखेचे अध्यक्ष दीपक निलावार यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकल्याची घोषणा सोमवारी केली. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी तेलंगणच्या पूर्वीपासून म्हणजे शंभर वर्षांपेक्षा जास्त काळापासून केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते आजपर्यंतच्या अनेक नेत्यांचा विदर्भ राज्याला पाठिंबा राहिलेला आहे. मात्र, हे स्वप्न अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही. गेल्या दहा वर्षांत छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड अशी तीन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आणली असून आता तेलंगणच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना स्वतंत्र विदर्भामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात असल्याची जाणीव आहे. परिणामी, विदर्भ वेगळे राज्य होऊ नये, यासाठी पुरेपूर दबाव आणला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळे विदर्भाची निर्मिती रखडल्याची भावना तीव्र होऊ लागली आहे.  विदर्भातील विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना आंदोलनात खेचण्याचे प्रयत्न कितपत यशस्वी होतील, याविषयी चळवळीचे नेते साशंक आहेत. विधानसभा आणि लोकसभेत निवडून गेलेला एकही लोकप्रतिनिधी विदर्भाच्या आंदोलनात सहभागी होण्यास सध्या तरी फारसा उत्सुक नाही. त्यामुळे चळवळ थंडावली आहे. महासंघाने सर्वच लोकप्रतिनिधींना पत्रे लिहून आंदोलनाच्या पुनरुज्जीवनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. उद्याच्या आंदोलनात उत्तर प्रदेशातील नेते राजा बुंदेला, तेलंगण, बुंदेलखंड, बोडोलँड येथील काही नेते सहभागी होणार असल्याचे समजते. हे सर्व नेते त्यांच्या राज्यात स्वतंत्र अस्तित्वासाठी आंदोलन चालवीत आहेत. स्वतंत्र विदर्भ झाल्यास लाखो नवे रोजगार निर्माण होतील आणि विकासाच्या नव्या वाटा खुल्या होतील, असा दावा आंदोलनाच्या नेत्यांनी केला. उद्याच्या धरणे आंदोलनाला कितपत प्रतिसाद मिळतो यावरच आंदोलनाचे भवितव्य अवलंबून आहे.