कांदा लिलाव वादावरील तोडग्यासाठी संयुक्त समिती स्थापन Print

नाशिक , प्रतिनिधी
व्यापारी व माथाडी कामगार यांच्यातील वादावर कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर व्यापारी, माथाडी कामगार, बाजार समिती, शेतकरी, सहकार विभाग यांची संयुक्त समिती स्थापन करून महिनाभरात या प्रश्नावर मार्ग काढण्याविषयी मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत सहमती दर्शविण्यात आली. तोपर्यंत कांद्याचे लिलाव सध्या ज्या पद्धतीने सुरू आहेत तसेच सुरू ठेवण्यास संबंधितांनी मान्यता दिल्यामुळे इलेक्ट्रॉनिक काटय़ावरील वजनाची नोंद बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून केली जाणार आहे.
वादामुळे गेल्या आठवडय़ात जिल्हय़ातील बाजार समित्यांमध्ये बंद पडलेले कांदा लिलाव कृषीमंत्र्यांनी दिलेल्या बरखास्तीच्या इशाऱ्यामुळे सोमवारपासून पूर्ववत झाले. तोडगा काढण्यासाठी मुंबईत कामगारमंत्री हसन मुश्रिफ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. कांद्याच्या काटापट्टीवर इलेक्ट्रॉनिक वजनकाटय़ाचा पावती क्रमांक टाकावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.
, त्यास माथाडी कामगारांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे बंद पडलेले कांद्याचे लिलाव सुरू करण्यासाठी बहुतांश बाजार समित्यांनी कांदा लिलावाची काटापट्टी व सौदापट्टी माथाडी कामगार बनविणार तर इलेक्ट्रॉनिक वजनकाटय़ाच्या पावतीचा क्रमांक बाजार समितीचे कर्मचारी टाकणार, असा तोडगा काढला. बैठकीत कुणीही माघार घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अंतिम तोडगा निघाला नाही. यामुळे या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.