रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची मारहाण Print

* नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्रकार  
* पाच परिचारिकांसह दोन कर्मचारी जखमी  
प्रतिनिधी, नाशिक

विषबाधित रुग्णाचा मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील पाच परिचारिकांसह दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद आंदोलन’ पुकारत संशयितांवर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयात यापूर्वी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाणीचे अनेक प्रकार घडले आहेत. काही वेळा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टरांना काळे फासण्याचेही प्रकार झाले. यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात कायमस्वरूपी पोलीस चौकी असावी, ही मागणी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. असे असताना मंगळवारी पुन्हा एकदा नातेवाईकांच्या रोषाला नाहक कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले. सोमवारी मनोहर गायकवाड (४५) या विषबाधा झालेल्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुरुष वैद्यकीय विभागात उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत समोर दिसेल त्या परिचारिकेला मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. नातेवाईकांच्या मारहाणीत सुलोचना लोटणकर, आशा कटय़ारकर, अर्चना जावरे, प्राची बनसोडे आणि एम. व्ही. कुलकर्णी या पाच परिचारिका जखमी झाल्या, तर रामदास मांडे व राजू जेजुरकर हे दोन कर्मचारीही जमावाच्या तावडीत सापडले. मारहाणीत लोटणकर या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मारहाणीच्या या घटनेमुळे रुग्णालयात उपस्थित रुग्णांची तारांबळ उडाली. अनेकांनी कक्ष सोडून बाहेर पळण्याचा प्रयत्न केला. जमावाने परिचारिकांना मारहाण करून लगेच पोबारा केला. दरम्यानच्या काळात या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. मारहाणीत गंभीर जखमी परिचारिकेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी गणेश फडणीस यांनी दिली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या आवारात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु अद्याप त्यास मंजुरी न मिळाल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेहमी अशा प्रकारांना सामोरे जावे लागत असल्याचे फडणीस यांनी नमूद केले.