आंतरराष्ट्रीय बाजारातील दुग्धजन्य पदार्थाचे दर घटले Print

तानाजी काळे, इंदापूर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरची घसरण झाल्यामुळे दूध पावडर, केसीन या दुग्धजन्य पदार्थाचे दर कमी झाले. दूध पावडरच्या दरात प्रतिकिलो १५ रुपये घट झाल्याने दुग्ध व्यावसायिक व उत्पादक शेतकऱ्यांना याची मोठी झळ बसत आहे. सध्या दूध उत्पादकास ३.५ फॅट व ८.५ डिग्रीसाठी १७ रुपये दर मिळतो. गावपातळीवर संकलन करणाऱ्या संस्थेस १.५० पैसे प्रतिलीटर, डेअरी प्लँटवर दूध आणण्यासाठी प्रतिलीटर ७५ पैसे खर्च येतो. पॉलिथीन पिशवीसाठी प्रतिलीटर ९० पैसे तर प्लँटमधील व्यवस्थापनासाठी (कर्मचारी पगार, बँक चार्जेस, लाईट बिल, डिझेल) १.५० रुपये प्रतिलीटर खर्च येतो. राज्याभरात दूध वाहतुकीसाठी प्रतिलीटर २ रुपये खर्च येतो. शहरातील मुख्य वितरक कमिशन व अंतर्गत वाहतूक दोन रुपये प्रतिलीटर खर्च येतो. उपवितरकास प्रतिलीटर फक्त एक रुपया कमिशन मिळते. छोटय़ा दुकानदारास फक्त २ रुपये प्रतिलीटरमागे फायदा होतो. शहरातील ग्राहकांना गाईचे दूध प्रतिलीटर २९ रुपयेप्रमाणे घ्यावे लागते. म्हणजेच दुधास १२ रुपये प्रतिलीटर संकलनापासून पुढे खर्च येतो. गेल्या वर्षभरात राज्य व देश पातळीवर दुधाचे उत्पादन अतिरिक्त झाल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर दूध पावडरची निर्मिती झाली. सुरुवातीस निर्यातबंदी असल्यामुळे उत्पादित साठे पडून राहिले. या पावडरची कालमर्यादा संपत आल्यामुळे मिळेल त्या भावात दुग्धजन्य पदार्थाची विक्री सुरू झाली.  त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे पशुखाद्याचे दर गगनास भिडल्यामुळे दूध उत्पादकांना ३.५ फॅट व ८.५ डिग्रीसाठी मिळणारा १७ रुपये प्रतिलीटर दर परवडत नाही.     
असा होतो दुधाचा वापर
५ टक्के वापर दररोजच्या वापरासाठी
६५ टक्के वापर दुग्धजन्य पदार्थाच्या वापरासाठी
५ टक्के वापर मिठाईच्या निर्मितीसाठी