जायकवाडी पाणीप्रश्नी राष्ट्रवादी आक्रमक Print

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी
प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी धरणात दोन-अडीच टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी बरीच खळखळ केली. मराठवाडय़ातील मंत्र्यांबरोबर खटकेही उडाले. ज्या धरणाचे अजून कालवेच तयार झाले नाहीत, त्या निळवंडे कालवा सल्लागार समितीचा होकार कशासाठी हवा, असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित केला. तो पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या जिव्हारी लागला. सिंचन विभागातील अधिकाऱ्याला गुरू केले आहे काय, अशी विचारणा केली गेली. पाणीप्रश्नी मराठवाडय़ातील राष्ट्रवादीचे मंत्री ‘आक्रमक’ झाल्याचे चित्र बैठकीत होते, असे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी जलसंपदा विभागाच्या या बैठकीला गोदावरी खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष राहुल मोटे यांना निमंत्रितच केले गेले नव्हते. दरम्यान, नाशिक जिल्ह्य़ातून पाणी सोडण्यासाठी आठ दिवसांनी होणारी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्हावी, अशी मागणी मराठवाडय़ातील नेत्यांनी केली.
दोन ते अडीच टीएमसी पाणी सोडल्यास ते पाणी नदीचे पात्र ओले करेल. मात्र, त्यामुळे जायकवाडीच्या साठय़ात फारशी वाढ होणार नाही. त्यामुळे औरंगाबादसह जालना, अंबड व परळी औष्णिक विद्युत केंद्रासमोरील जलसंकट कायमच आहे. नगरमधील नेत्यांनी नाशिककडे बोट दाखविले. नाशिकमध्ये पिण्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्याची आकडेवारी नव्याने तपासण्याची गरज असल्याचे बुधवारी सांगण्यात आले. उद्योगांना पाणी द्यायचे की नाही, यावरही बरीच खडाजंगी झाली. मराठवाडय़ातले उद्योग पाण्याअभावी बंद पडले तर नाशिकमधील उद्योगाचे पाणी थांबवणार का, असा सवाल केला गेला. नाशिक जिल्ह्य़ातील अधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याने आणखी किती पाणी सोडायचे, याचा निर्णय आठ दिवसांनी होईल. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते पाणी देण्यासाठी खळखळ करतात, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री क्षीरसागर म्हणाले, की या प्रश्नी आम्ही आक्रमक भूमिका घेत आहोत. पाणी सोडायलाच हवे. कालवे, शेततळी भरून घेतल्यानंतरही पाणी देण्यासाठी खळखळ होत असेल, तर या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनीच निर्णय घेतलेला बरा.
मोटे यांना निमंत्रणच नाही!
मुंबईत झालेल्या बैठकीस गोदावरी खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष राहुल मोटे यांना मात्र निमंत्रणच नव्हते. वास्तविक ते मंगळवारी मुंबईतच होते. पण निमंत्रण नसल्याने बैठकीला जाता आले नाही, असे त्यांनी सांगितले. निळवंडे धरणातून पाणी सोडल्यानंतर नदीकाठचे शेतकरी मोटारी लावून ते उपसणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. तसे न केल्यास पाण्यात आणखी घट होईल, असेही ते म्हणाले. मराठवाडय़ातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जायकवाडीत पाणी यावे, यासाठी बाजू लावून धरली, तरी मराठवाडय़ातील नेत्यांमध्ये एकी नसल्याचे अधोरेखित झाले. परिणामी, दोन-अडीच टीएमसीचा निर्णय झाला.